पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन (सिंघम) कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२२
[सद रक्षणाय, खल निग्रहणाय।
हे ब्रीद सोबत घेऊन म्हणजे चांगल्या लोकांची रक्षा (रक्षण) करणारा व दृष्ट (वाईट) लोकांना कायद्याच्या हवाली करणारा अधिकारी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची मागणी]
पाचोरा तालुक्यातील सगळ्यात मोठे भौगोलिक क्षेत्र व पन्नास गावांचा समावेश असलेल्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री कृष्णाजी भोये यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागेवर नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक कोण येणार याकडे पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागून आहे.
कारण पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हे मागील काही वर्षापासून वेगवेगळ्या प्रकरणांमुळे चर्चेत असून मागील काळातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री राजभोज, मा.श्री. यु.डी सोनवणे यांची बदली झाल्यापासून या पोलिस स्टेशनला बदलीचे ग्रहण लागले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण या पोलिस स्टेशनला नवनवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच कधी राजकीय हस्तक्षेप तर कधी इतर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांची बदली करण्यात आली आहे.
परंतु आता सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांची पदोन्नती मिळाल्यामुळे बदली झाली आहे. मागील सहा महिन्यापूर्वी कृष्णा भोये साहेब पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत चांगली कामगिरी करत अवैध धंद्याच्या विरोधात मोहीम उघडून अवैधधंदे बंद करण्याची मोहीम उघडली होती. त्यांच्या या कामगिरीबद्दल जनतेतून कौतुक होत असतांनाच पदोन्नती मुळे त्यांची बदली झाली हे नक्की परंतु आता नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यासमोर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन म्हणजे एक आव्हान घेऊन उभे असणार असल्यामुळे या पोलिस स्टेशनला एखाद्या कर्तव्यदक्ष (सिंघम) सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नेमणूक करणे गरजेचे आहे.
कारण पिंपळगाव हरेश्वर हे पोलिस स्टेशनचे गाव असल्यावरही पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर तसेच गावात ठिकठिकाणी भरवस्तीत देशी व गावठी दारुची दिवसाढवळ्या खुलेआम विक्री सुरु असते. तर दुसरीकडे महत्त्वाचे चौक, हॉटेल, (पानपट्टी) पान टपरीवर तसेच काही खाजगी जागेवर दिवसाढवळ्या खुलेआम सट्टा बेटिंग व जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. हा अवैधधंद्याचा महापूर पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनपासून सुरु होऊन शिंदाड, डोंगरी सातगाव, वरखेडी, लोहारी, कोल्हे, सावखेडा तसेच लोहारा दुरक्षेत्र म्हणजे लोहारा पोलिस चौकी आऊट पोस्ट अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड, अंबे वडगाव, अंबे वडगाव तांडा नंबर १ अंबे वडगाव तांडा नंबर २, लोहारा, कळमसरा या मोठ्या लोकसंखेच्या गावातही मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या गावातील अल्पवयीन व तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. या अवैधधंद्यांंमुळे गावागावात अशांतता पसरली असून दररोज भांडणतंटे होत आहेत. या कारणांमुळे महिलांना आपल्या संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाले आहे.
म्हणून आतातरी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कोणाच्याही दडपशाहीला शह न देता गावागावातील सर्वप्रकारचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करुन सर्वसामान्य जनतेच्या रक्षणार्थ तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एखाद्या (सिंघम) कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व माता,भगिनींनी केली आहे.
(पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यकक्षेत एकूण ५० गावांचा समावेश असून पैकी १७ गावेही दूरक्षेत्र लोहारा अंतर्गत येतात. ज्या, ज्या गावात राजरोसपणे, दिवसाढवळ्या सर्व प्रकारचे अवैधधंदे सुरु आहेत. त्यांच्याबद्दल कुणी तक्रार केल्यास किंवा जाब विचारल्यावर आम्ही पोलिसांना हप्ते देतो आमचे काहीच होणार नाही असे छातीठोकपणे हे अवैधधंदे करणारे सांगतात या प्रकारामुळे पोलिस खरच हप्ते घेतात का ? हप्ते घेत असतील तर मग हे पोलिस कोण आहेत हे उघड करणे गरजेचे आहे. किंवा हे अवैधधंदे करणारे आपले पाप झाकण्यासाठी पोलिसांना मुद्दाम बदनाम करतात का ? हा विषय विचारात घेण्यासारखा असून काही ठिकाणी हप्ते वसूली करण्यासाठी झिरो पोलिसांची नेमणूक करुन हप्ते वसूली केली जाते असेही बोलले जाते. म्हणून पोलिसांनी याबाबतीत दक्षता घेऊन जनतेसमोर खरा प्रकार काय आहे तो समोर आणून पोलिसांना विनाकारण बदनाम करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे हे मात्र निश्चित)