हवेतील गारवा वाढल्याने, चहाचा गोडवा वाढला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२२
चहाचा शोध कसा लागला याबद्दल वेगवेगळी माहिती सांगितली जाते, मात्र वाचनात आलेल्या एका माहितीनुसार, चीनचे सम्राट शैन नुंग यांच्या समोर गरम पाणी भरलेला एक प्याला होता. या प्याल्यात काही सुकलेली पाने येऊन पडली, ही पाने पडल्यानंतर पाण्याला वेगळाच रंग आला. आणि जेव्हा सम्राटांनी या प्याल्यातील पाण्याचा एक घोट पिऊन पाहिला तेव्हा सम्राटांना या पाण्याची चव (स्वाद) खुपच आवडला. व येथूनच चहाचा प्रवास सुरु झाला.
अश्या या चहाचा शोध लागल्यानंतर या चहाने संपूर्ण जगात स्थान मिळवले आहेत. यात आपल्या भारतात तर चहाला खुपच महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजकाल कोणत्याही कार्यक्रमात चहा अविभाज्य घटक झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कारण चहा पाजल्याने बरीचशी कामे होतात व चहा नजरेआड केल्यास बऱ्याचशा संधी हातातून निघून जातात असे काही अनुभव दैनंदिन जीवनात येत आहेत. तुम्ही कितीही भेटलात, कितीही वेळ सहवासात राहिलात, मनमुराद गप्पा केल्या परंतु त्या ठिकाणी चहापाणी झाले नाही असे कधीही घडत नाही. व तसे झाल्यास (अहो त्याचे नाव नका घेऊ अमक्या दिवशी आपण इतका वेळ बसलो पण त्याने साधा चहा सुध्दा पाजला नाही असे टोमणे भेटते.) किंवा बरेचसे रुसवे, फुगवे, भांडण, तंटे मिटवण्यासाठी चहाचा गोडवा कामी येतो, म्हणून चहा म्हणजे इंडीयाकी मोहब्बत असेही म्हटले जाते.
असाच हा चहा आता सगळ्यांना मोहून घेत आहे. कारण निसर्गाच्या लहरीपणाचा वातावरणात परिणाम जाणवत असून हवेतील गारवा कमालीचा वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्यामुळे सगळ्यांना उब हवी असते म्हणून सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुरवात होते ती नवीन पध्दतीनुसार (बेड टी) सरळसरळ भाषेत सांगायचे झाले तर अंथरुणातला चहा हा घेतल्याशिवाय बऱ्याचशा लोकांची सकाळची सुरुवात होत नाही.
वातावरणातील गारवा व थंडीच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी व शरीरात उब निर्माण करण्यासाठी चहाची मागणी वाढली आहे. म्हणून हवेतील गारव्याने चहाचा गोडवा वाढलेला आहे. हे सगळीकडे नजरेस पडत आहे. असाच चहाचा उबदार घोट पाजणारा कुणी दिलदार सोबती भेटला म्हणजे झाल, मग चहाचा एक, एक घोट घेत असतांना कधी विविध विषयांवर चर्चा तर कधी सल्लामसलत कधी मैत्रीपूर्ण टंगळमंगळ, कधी चहा पाजणाराचे गुणगान सहजपणे या गोष्टी घडत असतात.
तसेच~कधी, कधी वादविवाद झाले तर (अरे मी साधा कुणाच्या चहाचा लिंम्पीत नाही असे सांगून निष्कलंक असल्याचा दाखला दिला जातो.)
यातच पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे संपूर्ण तालुक्यातील माहिती मिळवण्यासाठी व सगळ्यांना भेटण्यासाठीचे एकमेव ठिकाण अश्याच चौकात या थंडीत चहा पिणारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते म्हणून सद्यस्थितीत चहाचे चहाते घोळक्या, घोळक्याने चहा पितांना आपपल्या विषयावर गप्पाटप्पा मारुन मनमुराद आनंद घेतांना दिसून येत आहेत.