अंबे वडगाव येथे वीटभट्टी मुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात. ग्रामसेवक व तलाठी यांचा कानाडोळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२२
सुचना~(अंबे वडगाव येथे गावाजवळ सुरु असलेल्या अनाधिकृत वीटभट्टीची चौकशी होऊन येत्या आठ दिवसात मानव वस्तीजवळ असलेली ही विनापरवाना वीटभट्टी त्वरीत न काढल्यास याला जबाबदार असलेले ग्रामसेवक, तलाठी, सर्कल, प्रदुषण विभाग व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात येईल व न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल हे निश्चित.)
अंबे वडगाव येथे गावाच्या पूर्वेला पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत मानव वस्तीपासून अंदाचे फक्त आणि फक्त शंभर मीटर अंतरावर एक वीटभट्टी सुरु आहे. या वीटभट्टीमुळे अंबे वडगाव येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. कारण सद्यस्थितीत उन्हाळा सुरु झाला असून वातावरणातील तापमान खुपच वाढले आहे. त्यातच ही वीटभट्टी गावाच्या जवळच असल्याने भट्टी पेटवल्यावर अजुनच उष्णतेने तापमानात भर पडत आहे.
वीटा भाजण्यासाठी लाकडांचा सर्रासपणे वापर.
तसेच या वीटभट्टीतून निघणारा घातक धुर व एक विशिष्ट प्रकारचा वास (दर्प) निघतो या निघणाऱ्या कडवट वासामुळे ग्रामस्थ, महिला, लहान, लहान मुले, नवजात बाळ यांना श्वसनाचा त्रास होत असून आरोग्यासाठी घातक ठरत आहे. म्हणून गावाजवळ असलेली ही वीटभट्टी हटवण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आप्पा व अंबे वडगाव सजेचे तलाठी आप्पा यांच्याकडे संपर्क केला असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून तलाठी आप्पा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित तलाठी आप्पा फोन स्वीकारत नसल्याने आता नेमकी समस्या मांडावी कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीटभट्टी मालक हे वीटा बनवतांना सर्व अटी व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हा व्यवसाय करत आहेत आहे. कारण ‘विटा थापणे म्हणजेच नोटा छापणे’ असे म्हटले जाते. आम्हाला याच्याशी काही घेणेदेणे नाही. मात्र या उद्योगामुळे गावपरिसरात प्रदूषण वाढत असून त्यातून बाहेर पडणा-या क्लोरोफ्लोरो कार्बनमुळे प्रदूषण होते.
आहे.
वीटभट्टीवर साठवणूक केलेली लाकडे.
तसेच वीटभट्टीची परवानगी देतांना वीटा भाजण्यासाठी कोळशाचा वापर करण्यात यावा असा नियम असल्यावरही कोश्याच्या जागी सर्रासपणे लाकडाचा वापर करून वीटभट्टी पेटवली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड वाढली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचा कोळसा व लाकडे वापरून रात्रंदिवस सुरू असलेल्या धुनीमुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे विकार जडत आहेत.
यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र वाळू व्यावसायिकांप्रमाणे विटावाल्यांच्या दडपणामुळे तक्रार देण्यास नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी तक्रारींअभावी प्रशासनाकडून कारवाई होत नाही, असे गाऱ्हाणे परिसरातील त्रस्त नागरिकांनी मांडले असून याबाबत बोलायला गेल्यावर संबंधित वीटभट्टी मालक हा गावातील काही लोकांना हाताशी धरुन संबधितांना धमकावण्याचा प्रयत्न करुन आपसात भांडणे लावण्यासाठी तयार होतो.
तसे पहाता वीटभट्टी लावण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते यात
वीटभट्टी सुरू करण्यासाठी परवानगीसाठी अर्ज करतांंना त्या सजेतील तलाठी आप्पा, ग्रामसेवक आप्पा, सरपंच यांचा नाहरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी देतांना मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागा (स्थळ) पाहणी केल्याचा दाखला, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, ग्रामीण भागात व्यवसाय करायचा असल्यास ग्रामपंचायतीच्या परवानगीचा दाखला तहसीलदारांकडे सादर करावा लागतो. सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून तहसीलदार वर्षभरासाठी वीटभट्टी सुरू करण्याची परवानगी देत असतात.
शासनाच्या अटी व शर्तीची पुर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून परवानगी दिलेल्या जागेचाच वापर करावा, वीटभट्टीसाठी सांडपाण्याचा वापर करावा. वीटभट्टीच्या धुरापासून परिसरातील रहिवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. भट्टीमुळे आग लागण्यास त्याची जबाबदारी वीटभट्टीवाल्यांची राहील. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाल्यास परवाना रद्द होईल. तेथे तयार होणा-या राखेचा पुनर्वापर करावा. अशी नियमावली बंधनकारक आहे. मात्र हे नियम धाब्यावर बसवून अंबे वडगाव येथे वीटभट्टी सुरु आहे.
नियमानुसार वीटभट्टी ही मानव वस्तीपासून पाचशे (५००) मीटर अंतराच्या लांब पाहिजे असा नियम असल्यावरही अंबे वडगाव येथील वीटभट्टी ही मानव वस्तीजवळ असल्याने वीटभट्टी पेटवल्यावर वीटभट्टीतून निघणारा धुर, विषारी वायू व उष्णतेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. आता मार्च महीना संपणार असून एप्रिल व मे महिन्यात जास्तीत, जास्त उष्णतामान रहाणार असून या वीटभट्टीमुळे भविष्यात जास्तच त्रास होण्याची शक्यता आहे.
तसेच वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे दमा, मानसिक रोगाचा धोका असतो. सोबतच वीटभट्टीतून निघणाऱ्या उष्णतेमुळे अंगात ताप रहाणे, श्वास घेतांना त्रास होणे, धुर व उग्र वासाची अलर्जी होणे, सर्दी, खोकल्याचा त्रास होऊन जास्त काळ धूर शरीरात गेल्यास दम्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे स्वभावात बदल होऊन चिडचिड वाढते व मानसिक आजाराचा धोका असतो असे अशी माहिती नाक, कान, घसा तज्ञांनी सत्यजित न्यूजला अधिक माहिती साठी दिली आहे.
वीटभट्टी सुरू करण्यासाठीचे अधिकार हे प्रशासनाला असतात यात तालुकास्तरावर मा.तहसीलदार व जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी प्रशासनाला प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे मार्गदर्शक तत्त्वांचे पत्रक देण्यात आले आहे. त्याचे पालन न करणा-यांचा परवाना रद्द करण्याचा अधिकार तालुका व जिल्हा प्रशासनाला असतो. असे असले तरी पाचोरा शहरासह तालुक्यात खेडेगावात ठिकठिकाणी विना परवानगी वीटभट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्यांची परवानगी घेतलेली नसुन त्या शासनाच्या नियम व अटी नियमानुसार नसून सर्व नियम धाब्यावर बसवून या वीटभट्ट्या राजरोसपणे सुरु आहेत.
या वीटभट्टीच्या मालकांनी शासनाच्या नियमानुसार कोणत्याही परवानग्या घेतलेल्या नसून या वीटभट्ट्या मानववस्ती जवळ आहेत. तसेच या विटा बनवण्यासाठी सांड पाण्याचा वापर न करता नदी-नाले गावाच्या आसपासच्या विहिरीचे पाणी वापरले जात असल्याने भविष्यात गुराढोरांना पिण्यासाठी चे पाणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच विटा भाजण्यासाठी कोळसा वापरावा हा नियम असल्यावरही वीट भट्टीचे मालक कोळश्या ऐवजी लाकडाचा वापर करून कमी खर्चात जास्त पैसा कमावण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहेत. एका बाजूला शासन वृक्ष लावा, वृक्ष जगवा या योजनेअंतर्गत निसर्ग वाचवण्यासाठी कोटीने पैसा खर्च करत असतांंना दुसरीकडे मात्र विटा भाजण्यासाठी लाकडाचा सर्रास वापर होत आहे.
तसेच विटा बनवण्यासाठी माती उचल करतांंना परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु परवानगी न घेताच सार्वजनिक जागेवरून माती उचलून शासनाचा कर बुडवला जात आहे. तसे पाहता विटा बनवण्यासाठी माती उचल करतांंना वसुली विभागाकडे रीतसर रॉयल्टी भरून परवानगी घेऊन किती ब्रास माती उचल करणार आहे त्यानुसार रॉयल्टी कर भरणे गरजेचे असतांंना सुद्धा परस्पर माती उचल करून शासनाचा लाखो रुपये निधी बुडविला जात आहे. म्हणून वरील सर्व वीटभट्ट्याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.