पाचोरा पुरवठा विभाग अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेत, स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ जात आहे काळ्याबाजरात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२२
पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात सगळीकडे स्वस्त धान्य दुकानदार गोरगरिबांना मिळणारे हक्काचे स्वस्त दरातील धान्य वाटप करतांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. मात्र वारंवार तक्रारी करुनही एका बाजूला मा.जिल्हाधिकारी, मा.प्रांताधिकारी, मा.तहसीलदार साहेब या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने दुसरीकडे मात्र पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानदार हे गोरगरिबांना मिळणाऱ्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करुन वाहत्या गंगेत हात धुऊन घेतांना दिसून येत आहे.
पाचोरा शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. तसेच मागील बऱ्याच महिन्यांचे धान्य वाटप झालेले नाही. अश्या बऱ्याचशा गावागावातून दररोजच्या तक्रारी येत आहेत. मागील आठवड्यात रेशनिंगचे गलथान कारभाराबाबत विविध संघटना व समाजसेवकांनी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन या निवेदनाच्या प्रती गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत पाठवल्या आहेत. यात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन सोमवंशी यांचाही समावेश आहे. परंतु अद्यापही संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा किंवा थेट कारवाई केल्याचे दिसून येत नसल्याने या स्वस्त धान्य दुकानदारांना संबंधित विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
याच संधीचा फायदा घेत काही रेशन दुकानदारांनी काही लोकांना हाताशी धरुन व्यापारी व राईस मिल यांच्या संगनमताने रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार सुरु केला असून या मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात तांदुळ काळ्याबाजरात पाठवला जात असल्याचे दिसून येते. हा काळाबाजार करण्यासाठी गोरगरिबांना मिळणाऱ्या हक्काच्या धान्याची हेराफेरी केली जात आहे. यात बऱ्याचशा रेशनकार्ड धारकांना पुरेसे धान्य दिले जात नाही. तसेच पाचोरा तालुक्यात बंजारा बांधव व इतर हातमजूरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे मजूर आता उसतोड व इतर कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. यांचेही धान्य परस्पर हडप केले जात आहे. तसेच धान्य वाटप नियमितपणे वाटप केले जात नाही. कधीकधी दोन, दोन महिन्याचे धान्य मिळत नाही असेही समजते.
तसेच धान्य वाटप करतांना कोणत्याही रेशनिंगच्या दुकानात भावफलक तसेच धान्य मिळण्याचे सरासरी प्रमाण याबद्दलची कोणतीही माहिती ग्राहकांना दिली जात नाही. किंवा तसा फलक लावणे बंधनकारक असतांना महिती फलक लावला जात नाही. विशेष म्हणजे धान्य वाटप करतांना स्पॉश मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठ्याचा ठसा घेतला जातो मात्र त्या मशीनमध्ये कागदी रोल टाकलेला नसल्याने धान्य किती दिले, किती मिळाले हे वरच्यावरच ठरवले जात आहे. याबाबत विचारणा केल्यास कागद उपलब्ध नसल्याची बाब सांगितली जाते. म्हणजेच आपले पाप झाकण्यासाठी व ग्राहकांना खरी महिती मिळु नये हा हेतू दिसून येतो.
{वरखेडी येथील एका इसमाचे घरात पडलेला तांदूळ छायाचित्रात दिसत आहे. तांदूळ रेशनिंगचा आहे, फक्त गोणी (बारदाण) बदल करण्यात आले असल्याचे दिसून येते.}
असेच काळ्याबाजरात रेशनिंगचा तांदूळ घेऊन जाणारे बोलेरो (मालवाहू) वाहन कालरोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी वरखेडी येथून ताब्यात घेतल्याची जोरदार चर्चा वरखेडी परिसरात जनमानसतून ऐकावयास मिळत आहे. वरखेडी येथील एक तरुण रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार कोरणाची लागण झाली व लॉगडाऊन सुरू झाल्यापासून करत असून या महाशयांनी या व्यवसायातून लाखो रुपये कमाई केल्याचे समजते. तसेच याबाबत कुणीही जाब विचारल्यावर माझे हात खुपच लांब आहेत. असे सांगून दहशत माजवत होता अशीही चर्चा आहे.
पाचोरा तालुक्यासह जिल्हाभरात रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यावरही या काळाबाजार करनारांवर कारवाई का होत नाही ? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. किंवा या काळ्याबाजारीत सगळेच सामील आहे का अशीही शंका निर्माण होत आहे.
[कालरोजी पकडण्यात आलेले वाहन व तांदूळ पोलिसांच्या ताब्यात असुन हा तांदूळ खरच रेशनिंगचा आहे का ? याची पडताळणी करण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी पाचोरा पुरवठा विभागाला रितसर पत्र देऊन खुलासा मागीतला आहे. पुरवठा अधिकारी योग्य तपासणी करुन खरा अहवाल सादर करतील तेव्हा पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.]
(मात्र दुसरीकडे या काळाबाजार करणाऱ्या तांदूळ सम्राटाचे पाठीराखे पाचोरा तहसील व पुरवठा विभागासह पिंपळगाव पोलिस स्टेशनला चकरा मारुन त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.)
बघुया आता कायद्याचे राज्य आहे की कायद्यायचे व काय घ्यायचे राज्य आहे हे लवकरच समजून येईल.