कापूस व तुर चोरट्यांना पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी घेतले ताब्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२३
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी अशोक जैन यांच्या शेतातील कापूस व तुर अज्ञात चोरट्यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२३ शनिवार ते ०८ जानेवारी २०२३ रविवार दरम्यानच्या कालावधीत चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत शेतमालक अशोक जैन यांच्या फिर्यादीवरून दिनांक ०९ जानेवारी २०२३ सोमवार रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ०६/२०२३ भा. द. वी. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी गुप्त माहितीवरून अनिल सुतार या संशयितास ताब्यात घेत त्याच्या कडून अशोक जैन यांच्या शेतातील चोरुन नेलेला ९३ किलो कापूस व ६० किलो तुर व एक लोखंडी बोर्ड हस्तगत करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
तसेच दिनांक ०५ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी सातगाव डोंगरी येथील सकृद्दीन तडवी यांच्या घराचे कुलूप तोडून अंदाजे दोन क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत सकृद्दीन तडवी यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला भा. द. वी. ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी सलामत तडवी व समशूद्दीन तडवी यांना तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली व समशूद्दीन तडवी यांच्या घरातून चोरुन नेलेला दिड क्विंटल कापूस पोलिसांच्या हवाली केला आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याने यांची सखोल चौकशी सुरु असून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“माझ्या अनुभवातील शांत व सुस्वभावी अधिकारी सहाय्यक पोलीस
====================================
निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब” (अशोक जैन.)
====================================
माझ्या शेतात चोरी झाल्यानंतर माझे बरेचसे आर्थिक नुकसान झाले होते. चोरी झाल्याचे लक्षात येताच मी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला जाऊन रीतसर तक्रार दाखल केली व चोरटा नाही सापडला तर आपल्याला नुकसानभरपाई मिळणार नसल्याने मी हतबल झालो होतो. परंतु पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. वाघमारे साहेब व उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार साहेब व इतर पोलिसांनी माझ्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत कसोसीने तपास करत माझ्या शेतातील चोरीला गेलेल्या मुद्देमालासह चोरटा जेरबंद केल्याने मला माझा शेतमाल परत मिळाला आहे. म्हणून मी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आभारी आहे.
सदरची कारवाई मा. पोलिस अधिक्षक श्री. एम राजकुमार सर, मा. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलिस नाईक शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक शैलेश चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी केली आहे.