आम्हाला फुकटच काहीच देऊ नका, मात्र आमच्या गावातील गावठी दारु, सट्टा, पत्ता, जुगार बंद करा पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१०/२०२२

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील शहरांसह छोट्या, मोठ्या खेड्यापाड्यात व वाडा वस्तीवर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून यात गावागावातून गावठी दारु, सट्टा, पत्ता, जुगाराच्या दिवसाढवळ्या चालणाऱ्या अड्यासह बनावट देशी दारुची मोठ्या प्रमाणात खुलेआम विक्री होत असल्याने गावागावांतील गल्लीबोळातून अशांतता पसरली असून अल्पवयीन, मध्यमवयीन व जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत.

या कारणांमुळे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक आपल्या व्यसन पूर्तीसाठी रेशनिंग दुकानातून मिळणारे शासनमान्य दरातील तसेच मोफत मिळणारे धान्य परस्पर विकून तसेच घरातील भांडी, संसारपयोगी वस्तू, महिल्यांच्या अंगावरील दागिने गरज भासलीच तर सौभाग्यवतींना मारठोक करुन गळ्यातील मंगळसूत्र विकून आपली तलफ भागवत आहेत. तर काहींनी आपली व्यसनपूर्ती करण्यासाठी शेतातील कापूस, शेती अवजारे बकऱ्या, कोंबड्या चोरुन नेत तसेच खाजगी सावकाराकडून कर्ज घेत असल्याच्या घटना घडल्या असून यापैकी काही चोऱ्यांची संबंधित पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे भरवस्तीत सट्टा, पत्ता, जुगाराचे व दारु विक्रीचे अड्डे दिवसाढवळ्या, राजरोसपणे, रात्रंदिवस सुरु असल्याकारणाने धार्मिक स्थळे, हमरस्त्यावर, शाळेजवळ, बसस्थानक परिसरात, महिलांच्या शौचालयाजवळ या परिसरात व्यसनाधीन लोकांचा रात्रंदिवस नंगानाच व गोंधळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिला, शाळेत जाणारे, येणारे विद्यार्थी, शेतात कामानिमित्त बाहेर बाहेर जाणाऱ्या महिलांना या व्यसनाधीन व भररस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दारुड्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे.

या व्यसनाधीनतेमुळे घराघरात भांडणतंटे होत असल्याने महिलांना संसार करणे मुश्किल झाले असून एका बाजूला चॉकलेट पाहिजे म्हणून रडणाऱ्या पोटच्या पोराला चॉकलेट साठी पैसे नाहीत तर दुसरीकडे त्याच घरातील कुटुंबप्रमुख दररोज २००/०० ते ३००/००
रुपये दारुत उडवतो तर सट्टा पत्ता खेळणारे दिवसाला ५००/०० ते १०००/०० रुपये उडवत असल्याचे दिसून येते. या सर्व जाचाला कंटाळून सट्टा, पत्ता, जुगार व गावठी दारुचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा म्हणून व्यसनाधीन लोकांच्या कुटुंबातील महिला, माता भगिनींनी देवाला साकडे घातले आहे.

तसेच शासनाने आम्हाला रेशनिगचे सवलतीच्या दरातील व फुकटचे धान्य व इतर सवलती नाही दिल्या तरी चालतील परंतु आमच्या गाव परिसरातील सट्टा, पत्ता, जुगार, व अवैध दारुची विक्री हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी केली आहे.

लोकप्रतिनिधींनीचा व जबाबदार घटकांचा अवैध धंदे करणारांना छुपा पाठिंबा ~
सद्यस्थितीत शहरांसह खेड्यापाड्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना फक्त कायद्याचे रक्षकच कारणीभूत नसून बऱ्याचशा गावातील पदाधिकारी तेवढेच जबाबदार आहेत. कारण काही पदाधिकारी हे आपली सत्ता टिकवण्यासाठी व सत्ता मिळवण्यासाठी अश्या गावगुंडांना पाठीशी घालत असतात तसेच शासन, प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा समजल्या जाणाऱा महत्वाचा घटक म्हणजे पोलीस पाटील यांचाही (काही गावातून) छुपा पाठिंबा असल्याचे काही गावातून जनमानसातून ऐकायला मिळत आहे.

तर दुसरीकडे बऱ्याचशा गावातून ग्रामपंचायतीने व पोलीस पाटलांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामसभेचे ठराव व इतर वेळेस वेळोवेळी अर्जफाटे संबंधित पोलिस स्टेशनमध्ये व वरिष्ठ अधिकारी व कार्यालयात पाठवल्यानंतर सुध्दा त्या गावातील अवैध धंदे बंद होत नसल्याने व संबंधितांवर कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने संबंधित गावातील पदाधिकारी व पोलीस पाटलांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

कारवाई होत नसल्याने अर्जफाटे करणारांना शिवीगाळ ~
अवैध धंदे करणारांची तक्रार करुनही काहीएक कारवाई होत नसल्याने या अवैध धंदे करणारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून हे अवैध धंदे करणारे अर्जफाटे करणारांना दिवसाढवळ्या भरचौकात मोठमोठ्याने शिवीगाळ करून धमक्या देतात व आम्ही हप्ते देतो असे जाहीरपणे सांगून एकप्रकारे दहशत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणून आता या अवैध धंदे करणारांच्या विरोधात अर्जफाटे करण्यासाठी कोणीही धजावत नसल्याने गावागावातून अवैध धंदे वाढतच चिलले आहेत. म्हणून आतातरी वरिष्ठ पातळीवरून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता या अवैध धंदे करणारांच्या विरोधात धडक मोहीम राबवून कडक कारवाई करावी व हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या