अवैधधंदे बंद करण्यासाठी महेश पाटील यांनी लावला असाही फलक, गावठी व हात भट्टी दारू मिळण्याचे विश्वासनिय ठिकाण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२२
सद्यस्थितीत पाचोरा शहरातच नव्हे तर जळगाव शहरासह जिल्ह्यातील बोटवर मोजण्याईतकी गाव वगळल्यास खेड्यापाड्यात, गल्लीबोळात, वाडा, वस्तीवर भरवस्तीत, भररस्त्यावर गावठी दारु, सट्टा, पत्ता, जुगारासह चरस,भांग,गांजा मादक पदार्थ विक्रीचे अवैधधंदे दिवसाढवळ्या अव्याहतपणे राजरोसपणे सुरु आहेत. मागील महिन्यात तर आपल्या जिल्ह्यात ब्राऊन शुगर विकतांना आढळून आले होते. या अवैधधंद्याना कोणीही आळा घालत नसल्याने अल्पवयीन, तरुण मंडळी या व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडत आहे. यामागील कारण म्हणजे शाळा,कॉलेज बंद आहेत. सततचे लॉकडाऊनचे भुत मानगुटीवर बसत असल्याने हाताला मजूरी नाही. या विवंचनेत बरेचसे लोक व्यसनाच्या आहारी जात आहेत.
ही परिस्थिती पाहून काही समाजहीत जोपासणारे लोक आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून समाजहितासाठी या अवैधधंद्याना आळा घालण्यासाठी कायदेशीरपणे कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस प्रशासन व दारुबंदी विभागाकडे तक्रारी करत असतात. परंतु वारंवार तक्रारी केल्यावरही अवैधधंदे करणारांवर कोणतीही ठोस कारवाई होऊन हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद होतील अशी आशा बाळगणाऱ्या लोकांच्या नशीबी निराशाच येते. तसेच या अवैधधंद्याच्या विरोधात आवाज उठवणारांना काहीतरी कारण करुन त्रास दिला जातो किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र आखले जाते.
यामागील कारणही तसेच असते ते म्हणजे अवैधधंदे करणारांना मिळणारा राजाश्रय तसेच (सगळेच नाही) काही भ्रष्टाचारी असलेल्या कायद्याच्या रक्षकांकडून चिरीमिरी घेऊन मिळणारे अभय यांची सांगड मजबूत असल्याकारणाने हे सगळे संघटीत होऊन अवैधधंद्याना विरोध करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कटकारस्थान करत असतात. परंतु या सगळ्या दडपशाहीला न जुमानता समाजहितासाठी झटणारे हितचिंतक मात्र आपला लढा सुरुच ठेवतात. पाचोरा शहरातील अश्याच एका ध्येयवेड्या तरुणाने अवैधधंदे बंद होण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे.
पाचोरा शहरातील त्रंबक नगर भागातील रहिवासी असलेले मा.श्री. महेश पाटील या तरुण युवकाने गावठी विषारी दारू मंदिर व शाळेच्या मागे विक्री होते, याबाबत वारंवार उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता, परंतु कुठेही उत्तर मिळाले नाही किंवा या दारूबंदीसाठी दारुबंदी खाते व पोलीस विभागाने आजपर्यंत कधीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
म्हणून शेवटी या युवकाने अनोखी शक्कल लढवली असून थेट गावठी दारू व हात भट्टी दारू मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे रेणुका माता मंदिर व शाळेच्या मागे मिळेल असे बॅनर लावून मार्केटिंग करायला सुरुवात केली आहे, या बॅनर मुळे परिसरात एकच चर्चेचा विषय बनला आहे. याठिकाणी पाचोरा येथील उत्पादन शुल्क विभाग अथवा पोलिस विभाग आतातरी कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, या गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई झाली नाही तर मा श्री. महेश पाटील हे आंदोलन करणार असल्याचे समजते.