प्रशासकीय अधिकारी मा. श्री. राजेंद्र धस व ग्रामसेवक म्हस्के यांच्या विरोधात लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०९/२०२३
वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी व ग्रामसेवकाचा कारभार म्हणजे (उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक) अश्या पध्दतीने सुरु असल्याने यांच्या विरोधात लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे दिनांक ३१ ऑगस्ट गुरुवार रोजी विस्तार अधिकारी राजेंद्र धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली होती. या ग्रामसभेत मागील काळात आजपर्यंत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यां सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची तसदी घेतली नसल्याने आजपर्यंत झालेल्या ग्रामसभा म्हणजे “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे” या पध्दतीने घेण्यात आल्यामुळे ग्रामसभेवर ग्रामस्थांनी एकप्रकारे बहिष्कार टाकला असल्याचे जाणवत होते तरीही मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली.
या ग्रामसभेत मागील दोन वर्षांपासून बसवलेले ॲक्वा फिल्टर त्वरित सुरु करुन ग्रामस्थांना पाण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध करुन देणे, गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे म्हणून त्वरित स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. महिलांच्या शौचालयाचा प्रश्न महत्त्वाचा असून शौचालयाची व्यवस्था करणे, मागील काळात स्मशानभूमी जवळ बांधण्यात आलेल्या शौचालयांच्या जवळील अतिक्रमण काढून त्यांची दुरुस्ती, लाईट व पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देणे. कुऱ्हाड रस्त्यावर असलेल्या जुन्या शौचालयांची दुरुस्ती करणे तसेच नवीन बांधलेली शौचालये का पाडण्यात आली याचा खुलासा देणे, तसेच जर ती शौचालये खाजगी जागेत बांधण्यात आली होती म्हणून ती पाडली असतील तर मगा तेव्हा संबंधित सत्ताधारी व ग्रामसेवक यांनी खाजगी जागेत शौचालये का बांधली म्हणून त्यांच्याकडून शौचालये बांधण्यासाठी वापरला गेलेला निधी वसुल करणे. गावाचा सिटीसर्हे सर्हे झालेला असून त्याप्रमाणे गावातील वाढते अतिक्रमण काढणे गावातील सट्टा, दारु कायमस्वरूपी बंद करणे, बसस्थानक व मराठी मुलांच्या शाळेजवळ असलेले अतिक्रमण काढून शाळेच्या स्वरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गावातील गावठी डुकरांचा शंभर टक्के कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कडक कारवाई करणे, भररस्त्यावर सुरु असलेली मांस विक्री कायमस्वरूपी बंद करुन दुसरीकडे मांस विक्री करण्यासाठी सुचना देणे. सततचे होणारे भारनियमन बंद करण्यासाठी ठराव करुन विद्युत वितरण कंपनीला देणे. यावर्षी पावसाळा कमी होणार असल्याचे संकेत आहेत तसेच आपल्या कोकडी (म्हसळा) धरणात जलसाठा नाही परंतु काही शेतकरी पाणी उचलून शेततळे व विहीरी भरण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे म्हणून पाणी उचल (चोरी) होणार नाही अशी व्यवस्था करणे व पाणी चोरी करणारांवर कडक कारवाई करण्यासाठी ठराव मंजूर करणे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने गावात धुळ फवारणी करावी कारण डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत पिण्याच्या पाण्याचे दररोज शुध्दीकरण करुन पाणी सोडणे. पी. सी. के. कॉटन जिनींग फॅक्टरीला मुख्य जलवाहिनी वरुन दिलेले नळ कनेक्शन त्वरित बंद करणे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती तसेच या ग्रामसभेत विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.
असे असले तरीही तीन आठवड्याचा कालावधी उलटला तरीही प्रशासकीय अधिकारी मा. श्री. राजेंद्र धस व ग्रामसेवक म्हस्के यांनी ग्रामसभेत मांडण्यात आलेल्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेल्या ठरावानुसार कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला नसल्याने गावात गावठी डुकरांचा व गावठी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. गावातील सांडपाण्याच्या गटारीची दुरुस्ती व साफसफाई केली जात नसल्याने गावात दलदल निर्माण झाली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून बऱ्याचशा लोकांना थंडी, तापाची लक्षणे जाणवत आहेत. बरेचसे पथदिवे (ट्रीट लाईट) बंद आहेत तसेच नियमीतपणे वेळेवर पथदिवे (ट्रीट लाईट) लावण्यात येत नाहीत. ग्रामसेवक नियमितपणे कार्यालयात हजेरी लावत नाहीत. प्रशासकीय अधिकारी म्हणजे (उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक) अश्या पध्दतीने वागत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे
गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रशासकीय अधिकारी मा. श्री. राजेंद्र धस साहेब व ग्रामसेवक म्हस्के यांच्या विरोधात लवकरच मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे.