राष्ट्रीयीकृत बँकांचा आजपासून दोन दिवस संप. (कामबंद आंदोलन.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२१
राष्ट्रीयीकृत बँकांचे आजपासून दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारचा राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बँकांचे खाजगीकरण थांबविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह दहा बँक संघटनांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. जळगाव जिल्ह्यातील बँक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकारी व कर्मचारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन व ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर्स कॉन्फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन बँक खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या संपात सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रस्तावित बँकिंग अमेंडमेंट बिल २०२१ मध्ये होऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवस बँका बंद राहणार असुन या कामबंदमुळे पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील सुमारे ९६० कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. अशी माहिती समोर येत आहे. मागण्या मान्य न झाल्यास बँकां बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण होऊ नये म्हणून संपात उतरलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी दिलेली माहिती अशी की देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे दहा लाख कर्मचारी व अधिकारी हे संपावर आहेत. सरकार तर्फे येत्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बँके अधिनियम २०२१ हे मांडण्यात येणार आहे. त्यासाठी १६ डिसेंबर व १७ डिसेंबर २०२१ ला संपाला सुरुवात केली असून हा संप दोन दिवसासाठी आहे. तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढेही संप वाढू शकतो अशी माहिती देत आम्ही पुकारलेला संप हा बँकेच्या ग्राहकांच्या सार्वजनिक हितासाठी पुकारला असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
यात राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण झाल्यास खाते उघडायला ५०००/०० ते १००००/०० हजार रुपये लागतील, असे झाल्यास सर्वसामान्य नागरिक बँकेत खाते उघडू शकणार नाहीत. तसेच लहान खातेधारकांना कर्ज मिळणे मुश्कील होईल. इतर चार्जेस च्या नावावर ग्राहकांचे शोषण होईल. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्ज मिळणे बंद होईल, व सक्तीची कर्ज वसुली केली जाईल. सरकारी योजना राबवणे मुश्कील होईल. शैक्षणिक कर्ज मिळणे मुश्कील होईल. शासकीय अनुदानासाठी खाते उघडणे बंद होईल. बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण वाढेल बँकेत सर्वसामान्य जनतेचे प्रवेश बंद होतील. शाळकरी मुलांचे खाते उघडणे बंद होईल. व्याजाचे दर खाजगी बँका ठरवतील. नोकर भरती बंद होऊन कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाईल. ग्राहकांना कोणत्याही कामासाठी जास्तीत जास्त छुपे कर द्यावे लागतील.
म्हणजेच स्वातंत्र्य पूर्वी सावकार ज्या प्रमाणे लोकांचे शोषण करत त्याप्रमाणे खाजगीकरण झाल्यास खाजगी बँका ग्राहकांचे शोषण करतील. म्हणून सार्वजनिक बँकांचे संपत्तीची लिलाव थांबवण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ने दोन दिवसाचा संप पुकारला आहे. वरील माहिती लक्षात घेता हा संप बँक ग्राहकांच्या हिताचा असून बँक ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.