वरखेडी येथील मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत प.स. सदस्य पदाचाही दिला राजीनामा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे तसेच पंचायत समिती सदस्य मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी वैयक्तिक कारण दाखवत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत पंचायत समिती सदस्य पदाचाही राजीनामा दिला आहे. या अचानकपणे दिलेल्या राजीनाम्याने वरखेडी परिसरात एकच खळबळ उडाली असून असंख्य शिवसैनिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून शिवसैनिकांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. तर मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार हे आपल्या सोबत बरेचसे कार्यकर्ते घेत लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथील मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी सन २००८ ते २००९ च्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश करून एक सच्चा शिवसैनिक म्हणून उराशी कोणतीही लालसा न बाळगता जनसेवेचे व्रत हाती घेतलं होतं. जनसेवा करत असतानाच त्यांना त्यांच्या कामाची पध्दत व चिकाटी पाहून शिवसेनेतर्फे सन २०१७ साली कुऱ्हाड गणातून पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व सततच्या जनहितार्थ कामाची पावती म्हणून कुऱ्हाड गणातील गावागावातील जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त मते मिळाल्याने सगळ्यात जास्त फरकाने मा.श्री. ज्ञानेश्वर सोनार हे विजयी झाले होते. सोनार हे सदस्यपदी निवडून आल्यानंतर त्यांनी बरीचशी जनहितार्थ कामे केली आहेत व आजही करत आहेत. परंतु काही कारणास्तव ते बऱ्याच दिवसापासून पक्ष संघटनेपासून दुर होते.
परंतु आता त्यांनी अचानकपणे वैयक्तिक कारण देत शिवसेनेला सोडचिठ्ठी व आपल्या पंचायत समिती सदस्य पदाचाही राजीनामा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा.श्री. शरद पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
तसेच आता निवडणूक कालावधी जवळ येत असल्याने पक्षापक्षात रस्सीखेच सुरु झाली असून बरेचसे पदाधिकारी व कार्यकर्ते आपपल्या पक्षात न्याय दिला जात नसल्याची नाराजी व्यक्त करत पक्ष बदल करण्याच्या तयारीत असून काही दिवसात ही आवक, जावक वाढणार असून भविष्यात राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.