अवैधधंदे बंद करण्यासाठी पोलिस अधिकारी उतरले रस्त्यावर.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)पाचोरा.
दिनांक~०५/११/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कुऱ्हाड व परिसरात अवैध धंदे बोकाळले असून त्यात गावठी दारू, पुठल्या सट्टा, पत्ता, जुगार हे अवैधधंदे बंद करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून पिंपळगाव हरेश्वरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. श्री. कृष्णा भोये व उपनिरीक्षक मा.श्री. दिगंबर थोरात पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण राजपूत, संदीप राजपूत, रणजीत पाटील, शैलेश चव्हाण, उज्वल जाधव या सहकाऱ्यांसह कुऱ्हाड येथे अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरु केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे.
कारण या परिसरात व गावात अनेक दिवसांपासून हे अवैधधंदे सुरू होते, यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून काही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच नवतरुण मुले व्यसनाधीनतेमुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे. तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत.
सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची विक्री होत असल्याने गावात अशांतता निर्माण झालेली आहे. तसेच कुऱ्हाड येथील सर्व पक्षीय लोक त्यात ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास भगत,उपसरपंच अशोक देशमुख व सदस्य तसेच विरोधी सदस्य जगदीश तेली अरुण बोरसे,सुधाकर महाजन शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, मा.जी प सदस्य संतोष चौधरी आदींनी अवैध धंदे बंद करण्यासाठी पाठपुरावा करून या सर्वांची दखल घेत या पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केली आहे.
याचाच भाग म्हणून चार दिवसांपूर्वी कुऱ्हाड गावात एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून अनेक आरोपींसह पाच ते सहा दुचाकी जप्त केल्या होत्या व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसी हिसका दाखवला. पोलिसांच्या या सततच्या कारवाईमुळे गावातील ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गांनी समाधान व्यक्त केले असून ही कारवाई सतत सुरू ठेऊन अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी कुऱ्हाड ग्रामस्थ व महिला वर्गाकडून होत आहे.
दिवाळी नंतर मी स्वतः कुऱ्हाड व गाव परिसरात दररोज पेट्रोलिंग करून व धाडसत्र राबवून अवैधंद्यांचे विरोधात कडक कारवाई करणार असून ही कारवाई करतांना कुणाचाही हस्तक्षेप किंवा कोणतीही हयगय होणार नाही असे पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये यांनी सांगितले.