लोहमार्ग पोलिसांच्या वर्दीतील माणुसकी ! जखमी महिलेला ४ किलोमीटर झोळीतून नेत वाचवले प्राण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२१
लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून बरेचसे चांगले, वाईट अनुभव येत आहेत. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला तिच आई कोरोना बाधित झाल्यानंतर तिला तिला वाऱ्यावर सोडून जाणारा मुलगा व सुन पहावयास मिळाली, लहानग्या मुलाला कोरोनाची बाधा झाली म्हणून जन्मदेत्या आईने मुलाला दवाखान्यात सोडून पलायन केले तर बऱ्याचशा लोकांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यावर त्यांच्या परिवाराने अंत्यविधीसाठी आम्ही येऊ शकत नाही म्हणून पैसे घ्या पण तुम्हीच अंत्यसंस्कार करुन टाका असे सांगणारे पहावयास मिळाले.
मात्र दुसरीकडे आपल्या घर परिवाराला आपल्यापासून लांब ठेवत आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनासारख्या कठीण प्रसंगाला सामोरे जात कायदासुव्यस्था राखणे कामी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच अश्याच पोलिसांच्या दर्यादिली आणि माणूसकीच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत.
अशीच एक घटना लोणावळ्या जवळ जांबरुंग येथे घडली. रेल्वे लाईन ओलांडत असताना ४२ वर्षीय महिलेला धावत्या रेल्वेची धडक लागून मनक्याला मार लागला. या जखमी महिलेला लोहमार्ग पोलिसांनी चार किलोमीटर झोळीतून नेत तिचे प्राण वाचविले.
आशा दाजी वाघमारे (वय ४२) असे या महिलेचे नाव आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबरुंग येथे रेल्वेलाइन ओलांडत असताना धावत्या रेल्वे गाडीची धडक लागल्याने आशा यांच्या मणक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. जांबरुंग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत असल्याची माहिती लोणावळा स्टेशन मास्तरांनी दिल्यानंतर लोणावळा लोहमार्ग दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस नाईक जाधव व चार हमाल मालगाडीच्या इंजिनमध्ये बसून घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेला झोळीत उचलून चार किलोमीटर अंतर पायी चालत पार केले. त्यानंतर पळसदरी रेल्वेस्टेशन येथून रुग्णवाहिकेतून जखमी महिलेला कर्जत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दाखवलेल्या या माणूसकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. अनेक नेते व मंत्र्यांनी पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली आहे