पाचोऱ्यात बिलदीकर दांपत्य रंगवणार निवडणुकीचा फड; प्रभाग एक व आठ मधून पतिपत्नीच्या उमेदवारीची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२१
आगामी पालिका निवडणुकांची चाहूल गडद झाली असतांनाच सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक कामाला आहेत.सत्ताधारी शिवसेनेने देखील आ.किशोर अप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. भाजपा राष्ट्रवादीने देखील जनसंपर्क गतिमान केला आहे. त्यातच आ.किशोर अप्पा पाटील यांचे जिवलग मित्र ,उद्योजक तथा आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिलदीकर व त्यांच्या सुविद्य पत्नी पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालिका मयुरी बिलदीकर हे दांपत्य देखील यंदा निवडणुकीचा फड रंगवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
गत दोन दिवसात त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक आठ मध्ये वाढवलेला जनसंपर्क पाहता मुकुंद बिलदीकर हे प्रभाग क्रमांक एक मधून तर त्यांच्या पत्नी मयुरी बिलदीकर या प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.एकाच कुटुंबातून पतिपत्नी एकाच वेळी पालिकेच्या वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या प्रभागातून लढवण्याची ही पाचोऱ्यातील बहुदा पहिलीच वेळ ठरू शकणार असल्याने याची एकच चर्चा रंगली आहे.
यंदाची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्वाची मनाली जात असून सत्ताधारी शिवसेनेचा विजयी वारू रोखण्यासाठी राष्ट्रवादी,काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शहर विकास आघाडीत सामना रंगणार असल्याचे जनतेतून चर्चिले जात आहे.शासनाने घेतलेल्या नगरसेवकांच्या संख्या वाढीच्या निर्णयाने पालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ चार ने वाढणार असल्याने ३१ जागांसाठी पंधरा प्रभागाची रचना होईल असा तर्क व्यक्त होत आहे.
यात अनुसूचित जाती प्रवर्गातून एक जागा तर अनुसूचीत जमाती प्रवर्गातून एक जागा वाढण्याची शक्यता आहे.
त्यादृष्टीने विद्यमान नगरसेवकांसह नवीन इच्छुकांनी आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब सुरू केला आहे.यात शुभेच्छा फलक,शुभेच्छा कार्ड, मिठाई, सुकामेवा आदी वाटपाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला ‘सुप्त संदेश’ देत आपले नाव पोहचवण्यासाठी कसरत करतांना दिसून येत आहे.