पत्नीच्या नावाने बनावट स्वाक्षर्या करीत रक्कम काढणार्या पतीविरोधात गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२१
कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू असतांना पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेणाऱ्या पतीविरोधात एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाम्पत्यात कौटुंबिक वाद
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या जोगे वडगाव तांड येथील माहेर असलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील भोजू बंद्री राठोड यांच्याशी ८ मे २०११ रोजी समाजाचे रितीरिवाजाप्रमाणे झाला आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर पती-त्नी हे दोन्ही जैन कंपनीत कामास होते. सुरवातीला संसार सुखाने सुरु होता. मात्र काही दिवसानंतर पती, पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू झाला.
हा वाद विकोपाला जाऊन शेवटी न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई या २० मार्च २०१९ रोजी माहेरी निघून आल्या. प्रतिभाबाई यांनी जैन कंपनीत केलेल्या कामांचा पगार त्यांच्या खात्यात जमा होता. दरम्यान, पती भोजू बंद्री राठोड याने ७ एप्रिल २०२० ते ८ जुलै २०२० दरम्यान, पत्नीच्या नावे बँकेत असलेले ६२४००/०० रुपये पत्नीच्या बनावट सह्या करून वेळोवेळी काढून घेतले. ही बाब विवाहिता माहेरहून पैसे काढण्यासाठी जैन कंपनीसमोर असलेल्या एका बँकेत गेली असता त्यांच्या खात्यात पैसे नसल्याचे आढळून आले.
याबाबत प्रतिभाबाई राठोड यांनी बँकेत अधिक चौकशी केली असता
त्यांचे पती भोजू राठोड याने प्रतिभाबाई राठोड यांच्या खात्यातील रक्कम काढून नेल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम काढतांना प्रतिभाबाई राठोड यांची कोणतीही संमती किंवा स्वाक्षरी न घेता रक्कम काढून घेतल्याबद्दल १४ डिसेंबर २०२१ रोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भोजू राठोड याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. अमोल मोरे यांनी सखोल चौकशी केली असता प्रतिभाबाई राठोड यांच्या बनावट सह्या करुन तिचा पती भोजू राठोड याने प्रतिभाबाई राठोड हिच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले त्यावरून भोजू राठोड याचे विरोधात भा.द.वी.कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ नुसार रितसर गुन्हा नोंद केला असून पूढील तपास स्वता सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. अमोल मोरे हे करीत आहेत.