कुऱ्हाड गावात अवैधधंदे करणारांमध्ये गॅंगवार होण्याची शक्यता, वेळीच पायबंद घालण्यासाठी कुऱ्हाड ग्रामस्थांचे पोलीसांना साकडे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक या गावात मागील एक ते दीड वर्षापासून गावठी दारू, सट्टा, पत्ता, जुगार हे अवैध धंदे दिवसाढवळ्या रात्रंदिवस सुरु असून गाव परिसरात व शेत शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी दारू निर्मिती व विक्री जोरात सुरु आहे.
तसेच कुऱ्हाड येथून अंबे वडगाव,अंबे वडगाव तांडा नंबर १ अंबे वडगाव तांडा नंबर २, सार्वे, जामने, म्हसास, सांगवी, पाचोरा, लोहारी या गावांना ठोक पध्दतीने कॅन चे कॅन भरुन ठोक पध्दतीने मोठ्या प्रमाणात दारु पोहचवली जात असल्याचे दिसून येते.
तसेच कुऱ्हाड येथे जुगार, सट्टा, पत्ता खेळण्यासाठी व दारु पिण्यासाठी सांगवी, सार्वे, जामने, साजगाव, म्हसास, कोकडी तांडा या गावातील शौकीन येत असतात म्हणून कुऱ्हाड गावात व्यसनाधीन लोकांची जणू जत्राच भरत असल्याचे कुऱ्हाड ग्रामस्थ सांगतात. म्हणून कुऱ्हाड येथील अवैधधंदे हे आसपासच्या दहा खेड्यांची डोकेदुखी ठरत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
(विशेष महत्त्वाचे)
विशेष म्हणजे कुऱ्हाड गावातील सट्टा बिटींगचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून या गावात एका सट्टा किंगच्या पाच सट्टा पेढ्या आहेत. परंतु या गावातील सट्टा बेटिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीला जात असल्याचे पाहून दुसऱ्या एका सट्टा किंगने या गावात सट्टा पेढ्या सुरु केल्याने या गावात एकूण दहा पेढ्या सुरु झाल्या आहेत.
परंतु या दोघांच्या स्पर्धेच्या वादात मागील आठवड्यात या सट्टा पेढी चालकांमध्ये जोरदार खडाजंगी होऊ वाद झाला होता. हा वाद हमरीतुमरीवर येऊन मारामाऱ्या होईपर्यंत येऊन ठेवला होता परंतु गावातील ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असला तरी या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरुच एखाद्यावेळी मोठा वाद उदभवू शकतो असे दबक्या आवाजात बोलले जाते.
तसेच या अवैधधंदे करणारांचा वाद मिटवण्यासाठी काही स्वतःला प्रतिष्ठित म्हणून घेणारे लोक मध्यस्थी करत असून पुन्हा सट्टा पेढ्या चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु या अवैधधंद्यामुळे गाव परिसरातील बरीचशी कुटुंब बरबाद झाली असून बरीचशी कुटुंबे बरबादीच्या मार्गावर आहेत.
म्हणून कायद्याच्या रक्षकांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक गावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची विक्री कायमस्वरूपी बंद करुन व्यसनामुळे बरबाद होणारे संसार वाचवावेत व शांतता प्रस्थापित करावी अशी मागणी कुऱ्हाड गावातील ग्रामस्थ व महिलांनी केली असून पूढील आठ दिवसात संपूर्ण अवैध धंदे बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
तसेच अवैधधंद्याचे विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसत्र सुरु केले असून हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे.
परंतु अवैधधंदे करणारांची काही तथाकथीत व स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे काही हितचिंतक पाठराखण करत असल्याने कारवाईत अडथळा येत असल्याचे जनमानसातून ऐकायला मिळते आहे. तरी अश्या हितचिंतकांना त्यांची जागा दाखवून कठोर कारवाई करावी व अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी केली जात आहे.