कुर्हाड भागात रानडुक्कर च्या हल्ल्यात एक जखमी :जखमींना शासनाने मदत करावी.(सचिन सोमवंशी)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेत शिवारात रानडुक्कर च्या हल्ल्यात सालदार जखमी झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली आहे. तसेच वरखेडी येथून जवळच असलेल्या मानमोडी परिसरातील खडी फोडणाऱ्या मजूर महिलेवरही मागील महिन्यात जंगली श्वापदाने असाच हल्ला चढवला होता. अश्या घटना वारंवार घडत असूनही वनविभाग या जखमींना कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्याने वनविभागाने या हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करुन ते मानववस्तीकडे येणार नाहीत अश्या उपाययोजना करुन हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुऱ्हाड येथील सालदाराला औषधोपचारासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील मालखेडा, कळमसरा, लाख अश्या विस्तारित भागात वनविभागाचे जवळपास ३२७ हेक्टर जंगल असुन या जंगलाचे जवळील भागातील शेतकऱ्यांना हिंस्र प्राण्यांपासून खुप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच या जंगलाचे शेजारच्या शेतामध्ये शेत मशागतीसाठी राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्यावर या जंगलातील हिंस्र प्राणी नेहमी हल्ले करत असतात.
मागील दोन दिवसापूर्वी कुऱ्हाड येथील प्रगतीशील शेतकरी व शिवसेना शेतकरीसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांच्या शेतातील सालदार जब्बार तडवी यांच्यावर रानडुक्करने हल्ला करुन त्यास जखमी केले. जखमीवर पाचोरा येथील दवाखान्यात जखमींवर उपचार करण्यात आले. ही घटना माहिती पडताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जखमीला भेटुन घडलेल्या घटनेची माहिती घेतली.
यात त्यांना बऱ्यापैकी गंभिर बाबींची माहिती मिळाली यात प्रामुख्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी फक्त कार्यालयात बसून या जंगलाची देखभाल करतात या कारणांमुळे या राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असते या वृक्षतोडीमुळे कधीकाळी घनदाट असलेले जंगल आता खुपच विरळ झाले आहे. तसेच याच राखीव जंगलात ससे, हरिण, रानडुक्कर व नीलगायींची संख्या मोठ्या प्रमाणात असून या जंगलात थेट मराठवाडा, जळगाव, भुसावल परिसरातील शिकारी या जंगलात शिकार करण्यासाठी येत असल्याने शिकारींच्या भितीपोटी जंगलातील हिंस्र प्राणी बचावासाठी जंगल सोडून पळतात व मानववस्तीकडे आल्यानंतर ते दिसेल त्याच्यावर हल्ला चढवतात.
वनविभागाचे गलथान कारभारामुळे या जंगलाच्या लगत असलेल्या जवळपास ५०० हुन अधिक शेतकर्यांचे नुकसान नेहमी होत असून हिंस्र प्राण्यांचे हल्ले वारंवार होत आहेत. तरी वरिष्ठ पातळीवरुन वनविभागाने आणि शासनाने याकडे लक्ष देवून कायमस्वरूपी उपाय योजना करावी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांची त्वरित बदली करावी. अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे