चिमणी पाखरांचे अस्तित्व धोक्यात, उपाययोजनांची गरज,

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२१
आजच्या परिस्थितीत मानव प्रगतीच्या मार्गावर चालत असतांनाच अधोगतीला आमंत्रण देत असल्याचा अनुभव पावलो पावली येत आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे या भूतलावरील निसर्ग संपत्तीचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. नवनवीन प्रकल्प, कारखाने, यातून निघणारे विषारी वायू, स्वयंचलित वाहनांची वाढती संख्या यातून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साईड, चार पदरी रस्ते, दररोज हजारो एकर शेत जमीन बिगर शेती करून त्याच्यावर उभारली जाणारी सिमेंटची जंगल व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होत असून निसर्गाचा समतोल बिघडत आहे.
एका बाजूला आपली प्रगती होत असतांनाच दिसत असली तरी दुसऱ्या बाजूला होणारा निसर्ग संपत्तीचा ऱ्हास यामुळे बऱ्याचश्या अडचणी समोर येत आहेत. यात पावसाळ्यात उन्हाळा, तर उन्हाळ्यात पावसाळा, कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तसेच झपाट्याने कमी होत चाललेला ओझोन वायूचा थर, हवेतील झपाट्याने कमी होत चाललेले ऑक्सिजनचे प्रमाण यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्या, वाढते उष्णतामान अश्या अनेक समस्या अनेक उपस्थित होत आहेत.
या सोबतच नवनवीन आजार, नवनवीन विकार, नवनवीन व्हायरस अश्या समस्या डोके वर काढत आहेत. आत्ताच आपण कोरोनासारख्या महा मारीला सामोरे जात आहोत. व अजून अशी नवनवीन संकटे आपल्या दारावर येऊन ठेपली आहेत. या अनेक कारणांमुळे शंभर वर्षे जगणारा मानव आता मोठ्या मुश्किलीने पन्नाशी पार करत आहे.
तसेच वन्य प्राणी व पक्षी यांचा झपाट्याने नायनाट होत आहे. जंगली श्वापद, चिमणी पाखरांची संख्या नगण्य होत चालली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण प्रगती कडे जात असतांना मातीची घरे नष्ट झाली आहेत. अगोदर मातीची घर असतांना आपल्या घराच्या सऱ्यांमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये चिमणी पाखरं घरटी करून रहात होते. आता मातीच्या घराची संख्या कमी झाल्याने चिमणी पाखराचा हा निवारा हिरावून घेतला गेला आहे.
आपण या वरच थांबलो नसून आपल्या स्वार्थी वृत्ती साठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व जंगलतोड सुरू केली आहे. यामुळे बाभळी सारखी काटेरी झाडे नष्ट झाल्याने काटेरी झाडे खोपा बनवण्यासाठी सुरक्षित होती परंतु ती तोडण्यात आली असल्याने चिमणी पाखरांना सुरक्षित ठिकाणी घरटे करण्यासाठी उपलब्ध नाही.
म्हणून जागा उपी नसल्याने व त्यांची घरटी तयार करता येत नसल्याने त्यांच्या उत्पत्ती मध्ये घट होत आहे. यामागील कारण म्हणजे घरटी नसल्याने अंडी घालणे व उबवणे हे शक्य होत नाही. ही पाखरे कुठेतरी उघड्यावरच आपली अंडी देऊन मोकळे होतात. म्हणून त्यांच्या वंशाज पुढे वाढत नाही. तसेच शेतकरी शेती करतांना आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी बियाणे लागवडीपासून तर पीक घरात येईपर्यंत शेतात अनेक जंतुनाशकांचा यांचा वापर करतो.
यातून सुद्धा बरेच पक्षी मृत्युमुखी पडतात यापाठोपाठ काही तज्ञांच्या मते ठिकठिकाणी मोबाईल टावर (भ्रमणध्वनी टावर) उभारल्यामुळे या मोबाईलचा रेडिएशन मुळे सुद्धा पक्षी मृत्युमुखी पडत असल्याचे सांगण्यात येते. म्हणून आता आपल्या कथेतील चिऊताई लहानपणी आपल्या मुलांना रडतांना हसवण्यासाठी चु,चु ये चारा खा पाणी पी तसेच चिमणीचं घर मेणाच कावळ्याचं घर अशा बऱ्याच बालकथा फक्त सांगण्या व ऐकण्या पुरता राहतील. तसेच घरासमोर येऊन काव, काव करत पाहूणे येणार असल्याचा संकेत देणारा व पितृपक्षात भल्याभल्यांच्या स्वर्गात गेलेल्या नातेवाईकांची आठवण करून जेवणारा कावळा आज दिसेनासा झाला आहे.
म्हणून नवीन पिढीला ही चिमणी पाखरं फक्त चित्रातून ओळख करुन दाखवावी लागतील अशी वेळ येऊ शकते, म्हणून आज आपण आपल्या घरांच्या आसपास, सोसायटीच्या ओपन प्लेस मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे लावून तसेच, पक्षांसाठी आपल्या घराच्या वरच्या बाजूला हवामानाला मानवतील अशी व पक्षांना राहता येईल अशी घरटी बनवणे गरजेचे आहे. तसेच यांच्यासाठी आपले घराजवळ खाद्य व पाणी ठेवल्यास अजूनही या चिमणी पाखरांच्या संख्येत भर पडेल यात शंका नाही.
तसेच गावाच्या आसपास व घराजवळ झाडे लावणे महत्त्वाचे असून शेतीचे बांध व गावाजवळील पडीत जमिनीत बाभळीची काटेरी झाडे लावल्यास या झाडांवर पक्ष्यांना घरटे करून राहता येईल. तसेच यातून शेतकऱ्यांना फायदाच होईल कारण पक्षी हा शेतकऱ्याचा मित्र पक्षी असून आपल्या शेतात ज्वारी, बाजरी, उडीद व इतर पिकांवर पडणाऱ्या अळ्या व कीटक हे आपले भक्ष्य म्हणून वेचून खाण्याचे काम हे पक्षी करतात. म्हणून महागड्या फवारण्या करण्यासाठी लागणाऱ्या पैशाची बचत होईल.
म्हणून अगोदर भरपूर झाडे, झुडपे होती यावर मोठ्या प्रमाणात पक्षी असायचे हे पक्षी पिकावरील किटक, अळ्या खाऊन टाकायचे म्हणून काही वर्षाआधी जंतुनाशक फवारणी करावी लागत नव्हती परंतु आपण आपल्या स्वार्थासाठी वनराई नष्ट करत असल्याने त्यावेळेस पिकांवर जास्त फवारणी करण्याचे काम पडत नव्हते परंतु आपणच कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीप्रमाणे हिरवीगार झाडे व चिमणी पाखरांच्या अस्तित्वाला महत्व न देता स्वार्थापायी अनेक कारणांनी दुर्लक्ष करत असल्याने चिमणी पाखरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून आता तरी लवकर जागे होऊन चिमणी पाखरांची मैत्री करू त्यांचे संगोपन करावे असे निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी यांचे मत आहे.