जे नाही ललाटी ते देतो तलाठी, पिक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांची टाळाटाळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२१
शासनाने यावर्षी ऑनलाइन पिक पेरा लावण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतात जाऊन मोबाईल वरील ई पिक पेरा या ॲपचा वापर करुन आपापले पिक पेरे लाऊन घ्यावेत असे आदेश दिले आहेत. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्यामुळे तसेच ज्यांच्या कडे मोबाईल उपलब्ध आहे मात्र त्यांना त्या ॲपचा वापर करुन पिक पेरे लावणे शक्य नसल्याने विशेष म्हणजे शेती शिवारात नेटवर्क मिळत नसल्याने पिक पेरे लावणे शक्य झाले नाही. पिक पेरा लावण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतांनाच
मागील दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात वादळ, वाऱ्यासह जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे कापूस, तुर, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, उडीद, मुग, भाजीपाला असतील नसतील ती पिके नष्ट झाली. तसेच मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, खोंगळ्या यांना मोठ्या प्रमाणात पुर म्हणण्यापेक्षा महापूर आल्यामुळे या पूराचे पाणी शेतजमीनीतून गेल्याने शेतकऱ्यांच्या जमीनीवर असलेली पिके माती सहित वाहून गेली व कित्येक एकर जमीन होत्याची नव्हती झाली व त्याठिकाणी फक्त दगडधोंडे शिल्लक राहिले आहेत.
हे सार घडल्यानंतर शासनाने प्रशासनाला आदेश देत तलाठ्यांनी शेतात जाऊन पहाणी करुन तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आदेश दिले आहेत.
परंतु एका बाजूला मा.जिल्हाधिकारी साहेब थेट शेतकऱ्यांच्या शेतात चिखल तुडवत झालेल्या नुकसानीची पहाणी करुन शेतकऱ्यांचे अश्रू पुसत असतांनाच दुसरीकडे मात्र (काही) तलाठी शेतावर चिखलात व नाल्या, खोल्यांमध्ये जाऊन पंचनामे करण्यासाठी सरळ सरळ नकार देत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत असून अश्या बेजबाबदार उंटावरून शेळ्या चारणाऱ्या तलाठ्यांना वरिष्ठ अधिकारी यांनी समज देऊन शासनाने व पिक विमा कंपनीने दिलेल्या मुदतीच्या आत पंचनामे करुन द्यावेत हे शक्य होत नसल्यास पिकांचे पंचनामे करण्यासाठी मुदत वाढून मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तसेच तलाठी करतील तेच पंचनामे ग्राह्य़ धरले जाणार असल्याने आता सर्वकाही तलाठी आप्पांच्या हातात असल्याने (जे नाही ललाटी ते देईल तलाठी) अश्या आशेवर शेतकरी बसला आहे.