लूडो गेमची तरुणांना लागली चटक, पालकवर्ग चिंतीत .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०७/२०२१
लूडो गेमची तरुणांना चटक लागल्यामुळे तरुणाईच्या मानसिक, आर्थिक, शारिरीक व बुध्दिमत्तेवर दुष्परिणाम. होतांना दिसून येत आहेत.भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आजच्या प्रगत युगात मोबाईलचा शोध लागल्यापासून खुपच फायदे झाले आहेत. तसेच दुष्परिणामही झाले असल्याचे दिसून येत आहेत. मोबाईलने घराघरात जागा घेतली असून कुटुंबातील सदस्य किंवा मित्रमंडळी एकत्र बसले तरी मोबाईल हातात असल्याने आपसातील संवाद कमी झाले आहेत. या कारणांमुळे घरातील सदस्यांच्या विचारांची देवाणघेवाण, अडचणी याच्यावर चर्चा होत नसल्याने आपसातील गैरसमज वाढून आपुलकी व नात्यात दुरावा येत आहे.
विशेष म्हणजे मोबाईलच्या अति वापरामुळे भविष्यात लहानथोर नव्वद टक्के लोकांना दृष्टिदोष होईल व चष्मा वापरावा लागेल व काहींना अंधत्व येईल असे नेत्र तज्ञांकडून सांगितले जात आहे.
या दुष्परिनामापैकी एक म्हणजे मोबाईल मधील लूडो गेम (खेळ) हा टाईमपास म्हणून खेळला जात होता. मात्र आजमितीला लूडो गेम हा तरुणांसाठी मनोरंजन किंवा टाईमपास राहिलेला नसून तरुणाईला चटक (व्यसन) लागल्याने तो जुगार म्हणून खेळला जातो आहे.
या लूडो गेमच्या नावावर चक्क दहा रुपयापासून तर हजार रुपयांपर्यंत व अधिक रक्कम जुगारावर लावली जात असल्याचे दिसून येते. ज्यांना, ज्यांना या लूडो गेमचे व्यसन लागले आहे. ती मंडळी आपल्या लूडो गेमची व्यसनपूर्ती करण्यासाठी पैसे मिळावे म्हणून घरातल्या घरात भांडून पैसे घेणे, वेळप्रसंगी घरातील एखादी वस्तू विकणे, चोरी करणे अश्याप्रकारे पैसे उपलब्ध करून गेम खेळतांना दिसून येतात.
एकिकडे मोबाईल मुळे जग मुठीत आले असे वाटत असले तरी दुसरीकडे ज्या तरुणांच्या हातात घराचे, समाजाचे व देशाचे भवितव्य अवलंबून आहे तीच तरुणाई व्यसनाधीन होत आपल्या हातातून निसटून चालली आहे.
मोबाईल हातात आल्यापासून तरुणांचे खेळण्याचे, व्यायामाचे वय असल्यावरही ते तासंतास एकाच जागेवर बसून मोबाईल हाताळतांना दिसून येतात. म्हणून शारीरिक विकास होत नाही. तसेच लिहीण्याची, वाचनाची सवय कमी होत असल्यामुळे चांगली पुस्तके, चांगले साहित्य व शालेय अभ्यासक्रमात ते मागे पडत आहेत. तसेच स्मरणशक्ती कमी होत असल्याचे जाणवते.
विशेष म्हणजे ऑनलाइन अभ्यासक्रमाचे नावाखाली अशिक्षित असलेल्या कुटुंबातील मुलांना घेऊन दिलेल्या मोबाईलवर दरमहा कमीत कमी २५०/०० रुपयाचे रिचार्ज करुन आपला मुलगा ऑनलाइन अभ्यास करत असल्याचे गृहीत धरुन भविष्याची स्वप्न रंगवणाऱ्या कष्टकरी मायबापाच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे.
तर दुसरीकडे काही (सगळेच नाही) श्रीमंतीचा डंका वाजवून आमच्या मुलाकडे तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल आहे. असे दिमाखात सांगणारे पालक आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देऊन निश्चिंत होतात मात्र मुलांच्या हातात मोबाईल दिल्यानंतर त्याचा वापर कसा होतो हे पहात नसल्याने मुले भरकटतांना दिसून येतात.
म्हणून आता लूडो किंग व इतर शंभराहून अधिक घातक असलेले गेम तसेच युट्यूबच्या माध्यमातून दिसणारे नको ते अश्लील व्हिडीओ (चित्रफिती) हे मोबाईलवर सहज उपलब्ध होत असून अल्पवयातच मुले, मुली नको ती चुक करुन प्रलोभनांना बळी पडत आहे.
या मोबाईलच्या गैरवापरामुळे हजारो पालक चिंतीत झाले असून मोबाईलवर सुरु असलेले घातक गेम, ऑनलाइन सट्टा, जुगार, नको त्या चित्रफीत यावर कायदेशीर बंधन घालण्यासाठी काही पावले उचलून सायबर व पोलिसांव्दारे काही उपाययोजना व कायदा करून कारवाई करता येईल का ? तसे शक्य असल्यास शासन, प्रशासनाने त्वरित पावले उचलून बर्बाद होणारी भावी पिढी वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी सुज्ञनागरीकांनी केली आहे.