लॉकडाऊनच्या कालावधीत गरिब कुटुंब होत आहेत, हातोहात रातोरात लखपती. मालकाच्या शेतावर पिक रक्षणासाठी सालदाराच्या सदऱ्याचे बुजगावणे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०८/२०२१
मागील वर्षांपासून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मोलमजुरी, सालदारकी, लहानमोठी खाजगी नोकरी करणाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला हाताला काम नसल्याने व लहानसहान उद्योग बंद असल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणे कठीण झाले होते व आजही हीच परिस्थिती आहे.
परंतु एका बाजूला शहरी भागासह ग्रामीण भागात भल्याभल्यांना लॉकडाऊनचा फटका बसल्याने तसेच काहींना वैद्यकीय उपचारासाठी पैसा खर्च करावा लागल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने व उधार, उसनवारीचे वायदे संपल्यामुळे आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी अडचणीत सापडलेले कुटुंब आपल्याजवळ असलेली शेतजमीन, घर, प्लॉट, घरातील दागदागिने विकून अडचण भागवत असतांनाच दुसरीकडे काही धनदांडग्या लोकांनी या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमिनी, घरे व प्लॉट खरेदीचा सपाटा लावलेला आहे.
मात्र या पध्दतीने स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री करतांना बऱ्याचशा धनाढ्य लोकांनी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यासाठी व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत
आपल्याजवळील बेनामी संपत्ती दडपण्यासाठी आपल्या विश्वासातील गरीब परंतु इमानदार शेतमजूर, सालदार, नातेवाईक किंवा एखादा सर्वसामान्य माणूस की ज्यांची कुटुंब मोलमजुरी करुन पोट भरतात अश्या व्यक्तींवर भरवसा ठेवून त्यांच्या नावाने लाखो रुपये किंमतीची शेतजमीन व इतर स्थावर मालमत्ता खरेदीचा सपाटा सुरु केला असल्याने हे गरिबीत जीवन जगणारे आहे लोक हातोहात, रातोरात श्रीमंत होत असल्याची अफलातून जादू जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात दिसून येत आहे.
या गैरप्रकाराने ज्यांनी, ज्यांनी भ्रष्टाचार व इतर वाममार्गाने तसेच अवैध सावकारी किंवा अवैधधंद्यावर कमावलेल्या बेनामी काळ्या पैशाचे रुपांतर म्हणजे थोडक्यात (ब्लॉक मनी हा व्हाइट मनी) करण्यासाठी हा वापरला जाणारा फंडा देशासाठी, समाजासाठी घातक असून हे व्यवहार असेच होत राहिले व यांची चौकशी न झाल्यास शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडेल व भविष्यात भ्रष्टाचार, अवैधधंदे, लाचलुचपत व इतर वाममार्गाने पैसा कमावणारांसाठी पोषक वातावरण निर्मिती होऊन हे प्रकार जास्तीत जास्त वाढतील व भविष्यात गरिब श्रीमंतीची मोठी दरी निर्माण होऊन समाजात अराजकता माजेल अशी भिती सुज्ञनागरीक व अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.
तरी अश्या गैरप्रकाराने हातोहात, रातोरात श्रीमंत होणारांची चौकशी होऊन कर्ता व करविता धनी कोण हे वेळीच शोधले पाहिजे. अन्यथा भविष्यात चोऱ्या, दरोडे, लुटमार, आत्महत्या, उपासमारी, गरिबांचे शोषण, गुलामगिरी हे प्रकार वाढतील हे निश्चितच.