शेंदुर्णी येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर उपासमारीची वेळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०७/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी मालखेडा रस्त्यावर केळीच्या शेतात काम करत असलेल्या युवकावर मादी बिबट्याने अचानकपणे हल्ला केला. परंतु या अचानकपणे झालेल्या हल्यात शेख रईस शेख अयूब (३२) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हल्ला होताच युवकाने जोरजोरात आरडाओरडा केल्यामुळे जवळच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी एकच गोंगाट करुन मादी बिबट्याला पळवून लावले म्हणून पुढील अनर्थ टळला होता. ही माहिती मिळताच काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी युवकाला उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले होते. ही घटना दिनांक २८ जून मंगळवार रोजी सायंकाळी अंदाजे साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती.
ही घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल मा. श्री. हर्षद मुलांनी व पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. भारतजी काकडे, पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे, वनपाल प्रकाश देवरे, वनरक्षक योगेश साळुंखे, प्रकाश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सचिन कुमावत आदींनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पहाणी करुन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेख रईस शेख व त्यांच्या कुटुंबियांना भेटून सविस्तर माहिती जाणून घेतली होती.
तदनंतर घटना घडून गेल्यावर दिनांक २८ जून मंगळवारी शेख रईस हे जळगाव येथे उपचारासाठी गेल्यावर फक्त एक दिवस उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आले असून ते सद्यस्थितीत शेंदुर्णी गावातील एका खाजगी डॉक्टरकडे उपचार करुन घेत आहेत. वास्तविक पहाता बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेख रईस यांच्यावर वनविभागाकडून काळजी पूर्वक व जखमा बऱ्या होईपर्यंत उपचार करणे तसेच त्यांना आर्थिक मदत करणे अत्यंत गरजेचे होते. व तसा कायदा आहे.
असे असले तरी घटना घडल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास दहा दिवसांचा कालावधी उलटला तरीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मच्याऱ्यांनी जखमी रईस शेख यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने जखमी रईस शेख यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण रईस शेख हे भूमिहीन शेतमजूर असून उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने व ते जखमी असल्याने त्यांना दवाखान्यात लागणारा खर्च, घरखर्च करणे आवाक्याबाहेर असल्याने ते हतबल झाले आहेत.
ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जखमी रईस शेख यांनी पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे वारंवार संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. परंतु वनविभागाकडून मागील दहा दिवसांपासून येतो, आल्यावर बघू, अजून पंचनामा करणे बाकी आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने व अद्यापही पंचनामा किंवा जखमी रईस शेख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती जाणून घेत कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याने जनमानसातून वनविभागाच्या या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
महत्वाचे~
वनविभागाच्या राखीव जंगलात घुसून जर का सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन केले तर वनविभागाकडून क्षणाचाही विलंब न करता थेट कारवाई केली जाते. मग जेव्हा वन्यप्राणी सर्वसामान्य लोकांच्या शेत शिवारात किंवा इतर परिसरात येऊन एखाद्या व्यक्तीवर हल्ला चढवून त्याला जखमी करत असेल तर याची दखल घेऊन वनविभागाने याबाबत तातडीने मदत करणे क्रमप्राप्त ठरते. परंतु शेंदुर्णी येथील घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी किती इमानेइतबारे आपली जबाबदारी पार पाडतात हे दिसून येत आहे.