अंबे वडगाव ग्रामस्थांच्या मागणीला आले यश कोकडी येथील म्हसाळा धरणाचे सांडव्याची उंची दोन फुटाने वाढणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोकडी (म्हसाळा) धरणाच्या सांडव्याची उंची वाढून मिळावी म्हणून अंबे वडगाव ग्रामस्थांनी मागील बऱ्याच वर्षापासून मागणी केली आहे. याची दखल घेत आजरोजी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता के.व्ही.देशमुख,सहाय्यक कार्यकारी अभियंता नंदकिशोर शेवाळे यांनी कोकडी (म्हसाळा) धरणावर भेट देऊन पाहणी केली. व लवकरच कामाला सुरवात होणार असल्याचे सांगितले या प्रसंगी ॲड. मंगेशराव गायकवाड पाटकरी जगतराव निकम व ग्रामस्थ हजर होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव आंबे, कुऱ्हाड, कोकडी, कळमसरा, इत्यादी गावांच्या पाणी पुरवठा योजना, परिसरातील गुरंढोरं तसेच मालखेडा राखीव जंगलातील वन्य प्राणी इत्यादींसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत व वडगाव आंबे, कोकडी, कुऱ्हाड शिवारातील हजारो हेक्टर जमिनीसाठी कालव्याद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या कोकडी (म्हसाळा) धरण सन १९७२ मध्ये बनविण्यात आले आहे.
धरणांमध्ये साधारणतः पंधरा फूट पाणीसाठा होतो ,मात्र त्यावेळी धरणाचा सांडवा सुमारे दोन फूट जास्त खोल केला गेल्यामुळे धरणामध्ये दोनच फूट पाणीसाठा कमी साठवणूक होत होती. म्हणजेच धरणाची लेवल २८५ पॉईंट १० सेंटिमीटर इतके असताना सांडवा जास्त खोल असल्यामुळे २८४ पॉईंट ६ सेंटीमीटर इतक्या उंचीवर आल्यानंतर धरणातून सांडव्या द्वारे पाणी बाहेर निघून जात होते, त्यामुळे धरणामध्ये सुमारे पन्नास सेंटीमीटर पाणीसाठा कमी होत होता.
म्हणजेच धरण ८५ टक्के भरल्यानंतरच धरणाच्या सांडव्यातून पाणी बाहेर निघून जात होते, त्यामुळे प्रत्यक्षात धरण शंभर टक्के न भरताच सांडव्याची खोली जास्त असल्याने धरणातुन पाणी बाहेर निघून जात होते ,त्यामुळे पूर्ण क्षमतेने धरण न भरल्यामुळे पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासत होती, याबाबत ग्रामपंचायत वडगाव आंबे यांनी सातत्याने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरवठा केल्याने सदरची बाब पाटबंधारे विभागाच्या लक्षात आल्याने त्यांनी नुकताच सर्वे करून धरणाच्या सांडव्याची सुमारे दोन फुटाने सिमेंटची भिंत बांधून ऊंची वाढविन्यात येणार आहे.
सांडव्याची ऊंची दोन फुटाने वाढल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरेल त्यामुळे परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून आसपासच्या दहा गावातील पशुधन व लोहारा, कळमसरा, लाख, मालखेडा या राखीव जंगलातील जंगली प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनासाठी पाणी जास्तीचे उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.