सत्यजित न्यूजची दखल घेत , सार्वजनिक बांधकाम विभाग लागले कामाला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२१
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर वरखेडी ते पाचोरा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू होती. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यातच खड्डे चुकवण्याच्या नादात लहानमोठे अपघात होत होते तर वाहानांच्या कटबाजीने भांडणे होत होती. याची दखल घेत सत्यजित न्यूजने वारंवार आवाज उठवला होता परंतु पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग अजगरासारखे सुस्त होते. व लोकप्रतिनिधी बघ्याची भुमिका घेत होते.
म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा यांना जागे करण्यासाठी लोहारी येथील माजी सरपंच प्रविण पाटील, ग्रामपंचायत सदस्य सतीश खैरनार कुऱ्हाड येथील उत्तम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाचोरा सार्वजनिक बांधकाम वीभागाचा निषेध नोंदवण्यासाठी दिनांक १८ शनिवार रोजी खड्डे पुजनाचा कार्यक्रम ठेवला आहे असे सत्यजित न्यूजच्या माध्यमातून जाहीर केले होते.
तसेच या क्रार्यक्रमासाठी पाचोरा तालुक्याचे आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व जवळपासच्या गावातील सरपंच व सदस्यांना आमंत्रित केले होते. व सत्यजित न्यूजने आंबे वडगाव ते पाचोरा रस्त्यावर खड्डेच, खड्डे या शिर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते.
सत्यजित न्यूज कडून हा संदेश व बातमी शनिवारी रात्री सार्वजनिक करण्यात आल्याबरोबर रात्रीचे रात्रीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.ए.जी.शेलार (सहाय्यक अभियंता श्रेणी-१)यांच्या सुचनेनुसार श्री.डी.एम.पाटील व श्री.एस.ओ.काजवे (शाखा अभियंता) यांनी सत्यजित न्यूजकडे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सद्या पावसाळा सुरु असल्याने डांबरीकरण किंवा डांबराचा वापर करुन खड्डे भरणे शक्य नसल्याचे सांगत आम्ही शनिवार सकाळपासून खड्डे बुजवणार आहोत असे आश्वासन दिले व खड्डे पुजनाचा कार्यक्रम स्थगित ठेवण्याची विनंती केली होती.
म्हणून आमच्या समस्या आंदोलन न करताच सुटत असतील तर आम्ही खड्डे पुजनाचा कार्यक्रम रद्द करत आहोत असे लोहारी येथील माजी सरपंच प्रवीण पाटील, सतीश खैरनार व कुऱ्हाड येथील उत्तम पाटील या आंदोलन कर्त्यांनी सांगून खड्डे त्वरित बूजवण्यात यावेत असे सांगितले होते.
त्या मागणी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी त्वरित खड्डे भरण्यास सुरुवात केली व दिनांक १८ शनिवार रोजी सकाळपासूनच खड्डे भरण्यास सुरुवात केल्याने तात्पुरता का होईना वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. म्हणून पंचक्रोशीतील ग्रामस्थ, वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलन कर्ते व सत्यजित न्यूजचे आभार मानलेव सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.