डुकरे उदंड झाली, लक्ष्मी निघून चालली. गावठी डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०८/२०२१
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डुकरांचा मालक ग्रामपंचायतीची नोटीस घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे खात्रीपूर्वक समजले असून ग्रामपंचायतीने संबंधित मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, ही डुकरे दिवसभर गल्लीबोळात धुमाकूळ घालत असतात. यामागचे कारण म्हणजे गावात भुमीगत गटारी झाल्या असून गाव हागणदारीमुक्त होण्याच्या वाटेवर आहे. या कारणास्तव या डुकरांना खाद्य मिळत नसल्याने खाद्य मिळवण्यासाठी ही डुकरे दिवसभर गावात व गावातील घराघरात घुसून धुडगूस घालत आहेत.
विशेष म्हणजे सद्या शेती हंगामाचे दिवस असल्याने गावातील जवळपास नव्वद टक्के लोक शेती मशागतीसाठी शेतात गेलेले असतात. याचाच फायदा घेत ही मोकाट डुकरे घराच्या दरवाज्याला धडक देऊन थेट घरात घुसून घरातील अन्नधान्य फस्त करतात. तसेच गावातील मोकट कुत्रे डुकरांची शिकार करुन खात असल्याने या कुत्र्यांना रक्ताची चटक लागली असून हे मोकाट कुत्रे लहान मुलांनाही चावा घेत असून कुत्र्यांपासूनही भीती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे गावात गायी, म्हशी, बैल, शेळ्या यांना घरासमोर बांधल्यावर ही गावठी डुकरे गुराढोरांना खाण्यासाठी दिलेली ढेप व इतर वैरणावर ताव मारतात व गुराढोरांना चारा खाऊ देत नसल्याने पशुपालकांनी आपली गुरे शेतात बांधावी लागत आहेत तर काहींनी गुरेढोरे विकून टाकली आहेत. म्हणून गावात डुकरे उदंड झाली व लक्ष्मी निघून चालली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
तसेच गावाशेजारील शेतात घुसून पिकांची नासाडी करतात यात गावाजवळ शेती असलेले शेतकरी श्री. युवराज बळीराम पाटील, श्री. संजय लक्षुमण थोरात, श्री. वामन लक्षुमण थोरात,श्री. उत्तम शंकर चव्हाण,श्री. प्रकाश मधुकर चव्हाण, श्री. मंगेश मंन्साराम पाटील,श्री. दिनकर सदाशिव गायकवाड, श्री. दिलीप फुलचंद जैन. यांच्या शेतातील कापूस व इतर पिकांची नासाडी करत असल्याने दरवर्षी हाती आलेल्या पिकांची नासाडी होऊन आर्थिक नुकसान होते. तरी या गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही या निवेदनाव्दारे करित आहोत.
ग्रामपंचायतीकडे आजपर्यंत वारंवार अर्ज,फाटे केल्यानंतर ग्रामपंचायतीने संबंधीत डुकराच्या मालकास वारंवार नोटीस देऊन तसेच पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी देऊनही हा डुकरांचा मालक मनमानी करत असल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई होऊन गावातील डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा म्हणून अर्जातील सगळे तक्रारदार दिनांक सोळा ऑगस्ट १५/०८/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. याची आपण दखल घेऊन त्वरित डुकरांचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली असून या निवेदनाच्या प्रती
अधिक माहिती, ग्रुप ग्रामपंचायत वडगाव
वडगाव अंबे ता.पाचोरा, मा. गटविकास अधिकारी साहेब,पंचायत समिती पाचोरा, मा.तहसीलदार साहेब पाचोरा, मा.प्रांताधिकारी साहेब पाचोरा, मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव,मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन ,मा.उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब. पाचोरा ,मा.जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब जळगाव. यांच्याकडे पाठवल्या आहेत.