वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायत असून या मध्ये वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे गावाचा समावेश आहे. आता नुकतेच वडगाव जोगे गावासाठी जल जिवन मिशन अंतर्गत नवीन विहीर व पाईप लाईन मंजूर झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.
मात्र हे काम करतांना संबंधित ठेकेदार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम करत नसून विहीरीचे बांधकाम करतांना रींग (कंगणी) टाकतांना रेती (वाळू), खडी, सिमेंटचे प्रमाण योग्य प्रमाणात घेत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच रेती, खडी सिमेंटचे कालवण करण्यासाठी मिक्सर म्हणजे स्वयंचलित (हंडा मशीन) न वापरताच फावड्याने कालवण करुन थेट रींग कंगणी टाकतांना व्हायब्रेटर चा वापर करत नसल्याने काम थातुरमातुर होत आहे.
तसेच पाईप लाईन टाकतांना इस्टिमेट मध्ये ठरल्याप्रमाणे तीन फुट व त्यापेक्षा जास्त खोलवर चारीचे खोदकाम करुन पाईप टाकणे क्रमप्राप्त आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने पाईप लाईन टाकण्यासाठी खोदण्यात येणारी चारीचे तीन फुट खोल खोदकाम न करताच वरचेवर पाईप टाकून काम आटोपण्यासठी सपाटा लावला आहे. यामुळे भविष्यात पाईप लाईन वारंवार फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीचे सरपंच बबलू तडवी यांनी तक्रारी अर्जात नमूद केले असून सदर कामाची सखोल चौकशी करुन तपासणी अहवाल आम्हाला द्यावा तरच पुढील कामाला सुरुवात करावी अन्यथा या होणाऱ्या निकृष्ट कामाचे पैसे संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात येऊ नये असे नमूद केले आहे.
आता बघुया टक्केवारी वरचढ ठरते की इमानेइतबारे काम करुन घेण्यासाठी प्रयत्नशील असलेले सरपंच यांना न्याय मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.