पाचोरा शेतकीसंघाने नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, गहू त्वरित खरेदी करा,अन्यथा रस्त्यावर येऊ शेतकऱ्यांचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०५/२०२१
शेतकी संघाच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील मका,ज्वारी,गहू खरेदी सुरू करा अशी मागणी सत्यजीत न्यूजच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांनी केली असून मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी या समस्येवर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्या शिवाय रहाणार नाही. असा इशारा पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील मा.श्री. रमेश महाजन व असंख्य शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांचा ज्वारी मका,व गहू विकण्यासाठी पाचोरा तालुक्यातील शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे. परंतु प्रत्यक्षात आजपावेतो खरेदी केंद्रावर खरेदी करण्यासाठी सुरूवात झालेली नाही. तर दुसरीकडे खरीप हंगाम जवळ आला असून त्यांच्या पूर्व तयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणा-या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून आहे. माञ नावनोंदणी करूनही अद्यापपर्यंत खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
खरीप पीकांची पेरणी पंधरा दिवसाच्या अवधीवर येऊन ठेपली आहे. खरीप पीकाची पूर्व तयारी म्हणून शेतशिवारातील मशागतीची कामे पूर्ण झाली असून हातात पैसा नसल्याने ज्वारी, मका, गहू हे धान्य विकुन पैसा हाती येईल व बियाणे, खते घेता येतील या आशेवर शेतकरी बसलेला आहे. मात्र अद्यापही खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने धान्य खरेदी केव्हा सुरु होईल याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हतबल व हवालदिल झाला आहे. पाचोरा तालुक्यातील शेतक-यांनी आॅफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केले असून आॅनलाईन प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून शेतकरी बांधवांची नाव नोंदणी करून घेत तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी असंख्य गरजु शेतकऱ्यांनी केली आहे.
येत्या दोन दिवसात शेतकीसंघाने धान्य खरेदी सुरु न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा असंख्य शेतकरी बांधवांनी दिला आहे.