माझी अनुपस्थिती भासू देऊ नका, ना.मा.श्री. गुलाबराव पाटील.(पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२१
जळगाव महापालिकेत सत्ता उलथवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजवणारे शिवसेना नेता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पालकमंत्री हे मुंबईतच असून शुक्रवारी ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेतरी ते नेमक्या कुठल्या रुग्णालयात दाखल आहेत याबाबतची माहिती अद्यापही सर्वसामान्य जनतेला नाही.
परंतु त्यांच्या मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले असून जनतेला पुढील संदेश दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक आणि बंधू-भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र !
माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून याबाबतची माहिती आपल्यापर्यंत आलीच असेल. मात्र या निमित्ताने आपल्याशी संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे माझे मत आहे.
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या प्रारंभीपासूनच सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिकाराची तयारी केली होती. तर, २८ मार्च २०२० रोजी जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच जवळपास एक वर्षापर्यंत मी कोरोनाच्या लढाईत थेट मैदानावर उतरून याच्या प्रतिकाराचे प्रयत्न केले. या दरम्यान, आम्ही शेकडो रूग्णालये आणि हजारो रूग्णांच्या थेट संपर्कात आलो. यामुळे आम्ही आधी देखील अनेकदा चाचण्या केल्या असता त्या निगेटीव्ह आल्या होत्या. आता मात्र कोरोनाने गाठलेच. पण असो, या लढाईत कोरोनावर मात करून पुन्हा लवकरच आपल्या सेवेत सादर होईल हा मनाशी ठाम विश्वास आहे.
मी सध्या मुंबई येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असून आता प्रकृती चांगली आहे. यामुळे कुणी काळजी करू नका, आणि आपले माझ्यावर खूप प्रेम असले तरी, कृपया कुणी येथे भेटण्यासाठी येऊ नका. आणि हो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे माझे सहकारी, यात शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सदस्य सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आदींनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका. कोरोनामुळे आधीच अनेक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. यामुळे आपण सर्व नियमांचे पालन करा. सुरक्षित रहा, रूग्णांची मदत करा. मी काही दिवसांपर्यंत सार्वजनीक कार्यक्रम तसेच वैयक्तीक सुख-दु:खात सहभागी होऊ शकणार नाही. तेव्हा आपणच माझे प्रतिनिधीत्व करा. जनतेच्या मदतीसाठी धावून जा.
माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी *”मी जबाबदार “* ही दिलेली घोषणा पूर्णपणे लक्षात ठेवा, यानुसारच अंमलबजावणी करा ! लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता या सर्वांच्या एकजुटीनेच आपण कोरोनाला हरविणार आहे. यामुळे मी आपल्यात काही दिवस नसलो तरी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी माझी अनुपस्थिती भासू देऊ नका हेच माझे कळकळीचे आवाहन आहे. मी लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईल, तोवर कोराना विरूध्दच्या लढाईची सूत्रे ही आपल्याकडेच असल्याचे समजून कार्यकर्त्यांनी जनसेवा करावी, हीच अपेक्षा…!
*सदैव आपल्याच सेवेत…*
ना. गुलाबरावजी पाटील.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री