वरखेडी बाजारात मिरचीचा ठसका, सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२२
मिरची हा शब्द व पदार्थ मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. मिरची जरी तिखट असली तरी मिरची शिवाय स्वयंपाकघरातील पाककृती पूर्ण होत नाहीत. तसेच राजकारणात किंवा दैनंदिन जीवनात व्यवहारीक भाषा वापरतांनाही मिरची हा शब्द वापरला जातो थोडक्यात मिरच्या झोंबणे, मिरच्या लागणे, डोक्यावर मिरच्या वाटणे वगैरे, वगैरे परंतु हिच मिरची सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अत्यावश्यक आहे. मिरची शिवाय आपण जगूच शकत नाही कारण संसाराचा गाडा ओढतांना बिकट परिस्थितीत कधीकधी ठसका उठवणारी तर कधी डोळ्यात पाणी आणणारी मिरची व मीठ असले म्हणजे दोन घास खाऊन दिवस निघून जातात.
खरोखरच आपल्या जीवनात व जेवणात हवीहवीशी असणाऱ्या मिरचीचे खाद्यपदार्थ हॉटेलमध्ये पाहिल्यावर किंवा ताटात आल्यावर खवय्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी येते मात्र यावर्षी लाल मिरच्या वाढीव भावामुळे भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याचे तर हातमजूर, हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीबांच्या डोळ्यात पाणी येत असल्याचे जाणवते आहे. कारण यावर्षी बाजारात असलेल्या लाल मिरचीचे भाव गगनाला भिडले असून यात चपाटा मिरची ५००/०० रुपये रसगुल्ला मिरची ५००/०० रुपये बेगडी व कश्मिरी मिरची ६००/०० ते ७००/०० रुपये व गावरान मिरची २५०/०० ते ३००/०० रुपये प्रतिकिलो भावाने विकली जात आहे.
हे भाव ऐन उन्हाळ्यात वाढल्यामुळे या दिवसात शेतकरी वर्ग इतर लोक आपल्याला लागणारी बारा महिन्यासाठीची मिरची खरेदी करून ती वाळवून, कुटुन साठवणूक करत असतात. तसेच याच दिवसात पत्र्यावरचे डाळीचे वडे, दादरचे वडे, बारा महिने पुरतील इतका मसाला बणवण्यासाठी मिरची गरजेची असतांनाच या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिक व भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून भाव ऐकल्यावर मात्र गोरगरिबांच्या डोळ्यात पाणी येत आहे. एकिकडे भाव तेजीत आहेत तर दुसरीकडे मिरचीचे व्यापारी मिरच्या विकतांना बाजारात ठसका उठायला नको हे कारण पुढे करत जास्तीत, जास्त पाणी शिंपडून मिरची विकत असल्याने एक किलो मिरचीच्या वजनामागे १५० ते २०० ग्रॉम वजनाची घट लागत आहे.
भाववाढ होण्यामागची कारण जाणून घेतली असता यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच मिरच्या पिकावर नवनवीन (व्हायरस) रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने जवळपास ७० ते ८० टक्के उत्पादनात घट झाली असल्याचे सांगितले जाते. म्हणून बाजारात मागणीपेक्षा मिरचीची आवक कमी असल्याने व व्यापारी संघटन मजबूत असल्याकारणाने गरजू ग्राहकांना या महागड्या भावात लाल मिरची खरेदी करावी लागत आहे.