गावठी डुकरे धरुन न्या व मिळवा पाच हजार रुपये रोख बक्षीस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी डुकरांनी धुमाकूळ घातला असून या डुकरांमुळे गावपरिसरातील ग्रामस्थ व शेतकरी हैराण झाले असून ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीने डुकरांच्या मालका विरोध पोलीस स्टेशनला तक्रार देऊन वारंवार नोटीस देऊनही संबधित डुकरांचा मालक त्याचा मालकीची डुकरे धरुन नेत नसल्याने डुकरे धरुन नेण्यासाठी पाच हजाराचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव गावात भूमीगत गटारी बनवण्यात आल्या असून सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयाचा वापर होत असल्याने गावपरिसरातील घाणीचे साम्राज्य बऱ्यापैकी कमी झाले गाव हागणदारीमुक्त होण्याच्या वाटेवर आहे.
तसेच याच गावात मानववस्तीपेक्षा डुकरांची संख्या जास्त प्रमाणात झाली असून त्यांना खाद्य मिळणे मुश्कील झालेले असल्याने भुकेपोटी ही डुकरे थेट घरात घुसून धान्यावर ताव मारतात तसेच लहान लहान मुले गल्ली बोळातून जातांना त्यांना चावा घेतात. तसेच गावपरिसरातील शेतात जाऊन शेतीमाल फस्त करत आहेत.गावात बांधलेल्या शेतकऱ्यांच्या गायी, म्हशी, शेळ्या व बैलांना मांडलेली ढेप व चारा ही डुकरे खाऊन जातात.
या सर्व कारणांमुळे अंबे वडगाव ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच डुकराचे मालकाला याची जाणीव करुन दिल्यास तो गावातील काही लोकांना हाताशी धरून गावात भांडणे लावण्याची कामे करतो व संबधीतांना दादागिरी दाखवून ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची धमकी देतो.
या त्रासाला कंटाळून आता ग्रामस्थांनी एकमताने ही डुकरे गावातून धरुन नेण्यासाठी बक्षीस जाहीर केले असून जो कुणी ही गावठी डुकरे धरुन नेईल त्याला ग्रामपंचायतीकडून रितसर पत्र देण्यात येईल व ग्रामस्थांकडून पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.