भावपूर्ण श्रद्धांजली

मी अनुभवलेले (सखा+राम) मराठे. सर
मरावे परि किर्ती रुपे उरावे असे म्हणतात. असेच माझ्या सहवासातील अनुभवलेले स्वर्गीय सखाराम मराठे सर.
त्यांच्या नावातच सगळ सामावलेल होत.
सखाराम, सखा म्हणजे मित्र राम हा शब्द आठवला म्हणजे शुध्द चारित्र्य व ज्याप्रकारे रामनामाचा जप केल्याने मानसिक शांती व मोक्ष मीळतो असेच सखाराम सर यांच्या सोबत राहिल्याने मला खूपकाही शिकायला व अनुभवायला मिळाले असेच सखाराम मराठे सर नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले.
आज जरी ते आमच्यात नसले तरी मात्र आमच्या आठवणीत कायम रहातील म्हणून त्यांच्या विषयी माझ्या आयुष्यातील दोन शब्द श्रध्दांजली रुपात आपल्या समोर मांडत आहे.
स्वर्गीय श्री. सखाराम गणपत मराठे. सर हे वरखेडी येथील रहिवासी होतो. पेशाने ते शिक्षक होते . त्यांचे शिस्तप्रिय वागणे, कणखर बाणा, तसेच आध्यात्मिकतेचा गाढा आभ्यास व स्पष्टवक्तेपणा त्यांच्या अंगी असल्याने ते वरखेडी गावातच नाहीतर पंचक्रोशीत मराठे सर म्हणून परिचित होते.
यातूनच मागील ४५ वर्षापासून आम्हा तिघ भावांशी आपुलकीचे, जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते.
सन १९९० ते ९१ जवळपास आम्ही चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केले व त्या ट्रस्टच्या माध्यमातून नवतरुणांनमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून व्यायामशाळा, योगासन शिबीर, व्यसनमुक्ती, सर्पदंश समज, गैरसमज घालवून अंधश्रद्धा निर्मूलन करणे, सात्त्विक आहार शाकाहार, सदाचार असे अनेक उपक्रम राबवले त्यात मराठे सरांचा सिंहाचा वाटा असायचा.
हे करत असतांनाच गावातील काही व्यसनाधीन लोक मुद्दामहून त्रास द्यायचे त्यावेळी मराठे सरांची कणखर भुमिका कामी यायची.
सन १९९८ मध्ये वरखेडी येथे श्री. महावीर गोशाळा सुरु केली. तेव्हापासून ते आजतागायत मराठे सर हे तन, मन, धनाने गोशाळेसाठी अहोरात्र झटत असत.
गोशाळेसाठी चारा खरेदीसाठी चारा मोठ्या प्रमाणात लागतो म्हणून मराठे सर शेतशिवारात स्वता पायपीट करुन चारा कुठे मिळेल याचा शोध घेऊन चारा विकत घेऊन चारा वाहतुकीपासुन तर थेट गोशाळेच्या गोदामात भरेपर्यंत व्यवस्था करत वेळप्रसंगी मनुष्यबळ कमी पडत असे अशा वेळी मराठे सर स्वता चारा वाहतूक व चारा भरण्यासाठी श्रमदान करत असत.
मराठे सर वारकरी संप्रदायाचे असल्याने आध्यात्मिक ज्ञान प्रगल्भ होते. त्यांनी ठरवलं असत तर ते चांगले किर्तनकार होऊ शकले असते. तसेच ते मोठ्या मनाचेही होते ते मला म्हणायचे पप्पू भाऊ माझ्याकडे तुमच्यापेक्षा ज्ञान जास्त असेलही परंतु तुमच्याकडे असलेले ज्ञान हे तुमच्या आचरणात आहे. ते माझ्या जवळ नाही हे महत्त्वाचे आहे. त्यांचा सत्य स्विकारण्याचा स्वभाव, स्पष्टवक्तेपणा व परखड विचार हे त्यांचे विशेष गुण होते.
जान जाय पर वचन न जाय या प्रमाणे मराठे सर दिलेला शब्द पाळणारे होते. दिलेली वेळ व शब्द यात कधीच तफावत आढळली नाही.
मराठे सर दहा वर्षापूर्वी शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यावेळेस घडलेला प्रसंग मी आपल्या समोर ठेऊ इच्छितो.
सेवानिवृत्ती नंतर मराठे सर घरी आले तेव्हा त्यांचा मोठ मुलगा डॉक्टर योगेश मराठे याने आपण आता भाडेतत्वावर शेती करु असा प्रस्ताव मांडला त्यावेळी मराठे सरांनी स्पष्टपणे म्हणाले बाबारे तुला शेती करायची असेल तर तु शेती कर माझी मनाई नाही. तेव्हा डॉक्टरांना वाटले की वडील आज ना उद्या शेती सांभाळतील परंतु सरांनी शेवटपर्यंत शेतात पाय सुध्दा ठेवला नाही. ते म्हणायचे साठवर्षे संसाराचा गाडा ओढला आता मला अध्यात्माकडे वळायचे आहे व तो शब्द त्यांनी पाळला सुध्दा.
तसेच अजून एक प्रसंग आपल्यासमोर ठेवतो.
आमचे मोठे बंधू यांनी सेवानिवृत्ती नंतर मराठे सरांना सांगितले सर तुमचा जो फंड आहे त्या रकमेत तुम्ही ढेपचे पोते भरुन ठेवा त्यात तुम्हाला चांगला फायदा होईल तेव्हा मराठे सर भाऊंना म्हणाले भाऊ मला तो नफा नको आहे कारण मला मिळनाऱ्या पेन्शन मध्ये माझ्या पूर्ण गरजा भागून जातात. मला आता जास्त अर्थाजनाची गरज नाही. या प्रसंगात मराठे सर लोभी नव्हते हे सिद्ध होते.
अश्या आमच्या जिवलग मित्रास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व थांबतो.
तसेच ईश्वर मराठे सरांच्या कुटुंबास हे दु:ख पेलण्याची शक्ती देवो ही प्रभूचरणी प्रार्थना.
आपला शोकाकुल
पप्पू बडोला, संजय बडोला, संदेश बडोला.
अध्यक्ष~श्री. महावीर गोशाळा वरखेडी