पाचोरा, जामनेर, भडगाव व सोयगाव तालुक्यात डेटोनेटर कॅप व जिलेटिन तोट्यांची खुलेआम विक्री होत असल्याने वन्यप्राण्यांची शिकार व मासेमारी करण्यासाठी सर्रास वापर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०८/२०२२
(पाचोरा, जामनेर, भडगाव सोयगाव तालुक्यात डेटोनेटर कॅप व जिलेटिन तोटीची खुलेआम विक्री होत असल्याने वन्यप्राण्यांची शिकार व मासेमारी करण्यासाठी सर्रास वापर कारवाईची मागणी.)
पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात तसेच नदी, नाले व लहान मोठ्या जलयाशयाजवळील गाव परिसरात मासेमारी करण्यासाठी तसेच राखीव जंगलासह इतर शेती शिवारात वावरणारे रानडुक्कर व नीलगाय (रोहि) या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी डेटोनेटर कॅप व जिलेटिन तोटीचा सर्रास वापर करत आहेत. या स्फोटकांमुळे एखाद्या वेळेस शेत शिवारात कामकरणारा मजुरवर्ग व गाय, म्हैस, बकरी (शेळ्या) यांच्या जीविताला धोका होऊन मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भीती सुज्ञ नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
(‘मासेमारी करण्यासाठी जिलेटीन तोटीचा व डेटोनेटर कॅटच्या सर्रासपणे वापर’)
कमी वेळात व कमी श्रमात जास्त मासेमारी करण्यासाठी जीविताला घातक अश्या जिलेटीन तोटीचा व डेटोनेटरचा वापर करण्यात येत आहे. याकरिता जिलेटीन तोटीला एका वातीच्या साह्याने डेटोनेटर कॅप बसवून ही जिलेटीन तोटी पाण्याच्या मोठ्या डबक्यात किंवा नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात खोलवर जाऊन तळाशी ठेवून स्फोट घडवून आणला जातो. या स्फोटामुळे मोठा आवाज होतो व नदी, नाले व डबक्यात असलेली वाळू (रेती) चे बारीक दगड जोराने उडतात व यात पाण्यातील मासे जखमी होऊन मृत होतात तर काही फक्त आवाजाने मृत होऊन पाण्यावर तरंगतात मग मासेमारी करणारे व्यवसायीक हे मासे भरुन आणतात व त्यांची विक्री करतात.
परंतु अश्या पध्दतीने मासेमारी केल्यामुळे पाणी दुषित होते व हे पाणी पाळीव जनावरे गाय, म्हैस, बैल, शेळ्या यांच्या पिण्यात आल्यानंतर गाभण जनावरांचे गर्भ निकामी होऊन सुदृढ जनावरांना विविध आजाराला सामोरे जावे लागते यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता आहे. तसेच हे मासेमारी करणारे व्यवसायीक पाझरतलाव, धरण, नालाबांधाच्या थेट भिंतीजवळ खोलवर पाण्यात म्हणजे (पायाजवळ) जाऊन स्फोट घडवून आणतात. या स्फोटामुळे एखाद्यावेळेस धरण, पाझरतलाव, नालाबांधांच्या भिंतीला तडे जाऊन मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भिती जाणकार व सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
(‘डेटोनेटर कॅपचा प्राण्यांच्या शिकारीसाठी घातक वापर जीवितहानी होण्याची शक्यता’)
तसेच जंगलातील हरण, रानडुक्कर, निलगाय म्हणजे (रोही) या प्राण्यांची शिकार करुन त्यांचे मास विक्री करुन दररोज हजारो रुपये कमावणाऱ्या टोळ्या जामनेर, पाचोरा, सोयगाव, मुक्ताईनगर व इतर तालुक्यात सक्रीय झाल्या असून या टोळीतील शिकारी टोळ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी डेटोनेटर कॅपचा सर्रासपणे वापर करत आहेत.
या प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या गव्हाचे पीठ (कणीक) याचे गोडेतेल व पाणी टाकून गोळे बनवतात व पिठाच्या गोळ्यात डेटोनेटर कॅप घालून ते गोळे राखीव जंगलात, जंगलातील पाणवठ्यावर किंवा जंगली जनावरे वावरतात त्या रस्त्यावर ठेवून देतात. याच रस्त्यावरून हरण, निलगाय, रानडुक्कर हे प्राणी फिरत असतात व हे गोळ खातात गोळे खातांना डेटोनेटर कॅप दाताखाली येऊन घर्षण होताच त्या कॅपचा स्फोट होतो व जनावराचा जबडा फाटून तो जबर जखमी होऊन सैरावैरा पळत थोड्याच अंतरावर जाऊन पडतो व मृत होतो. नंतर हे दबा धरून बसलेले शिकारी या प्राण्याचे मास बनवून बाजारात विक्रीसाठी नेतात अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका गुरखी मजुराने सत्यजित न्यूजकडे सांगितली आहे.
अशा पध्दतीने शिकार केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाला यापासून मोठा धोका निर्माण झाला आहे. कदाचित जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलात व गवताड भागात डेटोनेटर कॅप टाकून पेरुन ठेवलेले पिठाचे गोळे जर गाय, म्हैस, बैल व शेळ्यांच्या खाण्यात आले तर या स्फोटकांमुळे पाळीव प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. म्हणून अश्या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.