१५ ऑगस्ट सालाबादप्रमाणे साजरा करेल पण ‘हर घर तिरंगा’ सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे अभिमान हाटकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२२
आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण स्वातंत्र्याचा ‘अमृत’ महोत्सव साजरा करणार आहोत. यानिमित्ताने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ सोहळा साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परंतु मी ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. मात्र ‘हर घर तिरंगा’ या मोहत्सवी सोहळ्यात मी सहभागी होणार नाही. अशा आशयाचे निवेदन जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात आमडदे येथून जवळच असलेल्या धोत्रे गावातील शेतकरी अभिमान राघो हाटकर या शेतकरी बांधवाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ गुरुवार रोजी निवेदन पाठवून आपल्या भावना कळवल्या आहेत.
याबाबत सत्यजित न्यूज ने अभिमान हाटकर यांची भेट घेऊन ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या निर्णयाबाबत सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता अभिमान हाटकर यांचे बोल खरच काळजाला भिडणारे असून सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन भरल्यासारखे आहेत. अभिमान हाटकर यांना जेव्हा या निवेदनाबाबत विचारले असता ते सांगतात की मी भारत देशाचा नागरिक आहे म्हणून भारतीय स्वातंत्र्याचा मला सार्थ अभिमान आहे.
परंतु भारत हा देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो व शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. आम्ही आमच्या काळ्या मातीत राब, राब, राबून आमच्या रक्ताचे पाणी करुन पिकविलेल्या अन्नधान्यामुळे फक्त मानवच नव्हे तर चिमणी, पाखरांच्या चोचीत जाऊन त्याचे पोट भरते हे करत असतांना आम्ही भर ऊन, वारा, पाऊसात रात्रंदिवस कष्ट करून शासनाला शेतसारा व इतर व्यवहारातून करही भरतो तरीही शेतकऱ्यांना पाहिजे तेवढे स्वातंत्र्य मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
अभिमान हाटकर पुढे सांगतात की शेतकऱ्यांना आजही व्यवसायाचे, तंत्रज्ञानाचे, जमीन किंवा संपत्ती विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. शेती माल आम्ही पिकवतो मात्र त्याचे दर (मुल्य) व्यापारी व व्यापाऱ्यांच्या, उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार ठरवते. असे बरेच ध्येय, धोरण व कायदे आहेत की त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी मात्र शेतकऱ्यांचे पारतंत्र्य संपलेले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली म्हणून एका बाजूला आज आपण जरी ‘अमृत मोहोत्सव’ साजरा करत असलो तरी दूसरीकडे या जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांनी गुलामीतल्या जगण्याला कंटाळून आत्महत्या करत मृत्यूला (कवटाळले) आपलेसे करून घेतले आहे हे विसरून चालणार नाही.
म्हणून भारतीय सरकारच्या आवाहनानुसार ‘हर घर तिरंगा’ फडकविण्याच्या उत्सवात सहभागी होण्याची माझी इच्छा होत नाही असे खेदाने नमूद करत येत्या १५ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिन मी सालाबादप्रमाणे सामील होऊन मी माझ्या देशाच्या तिरंग्याला आदरपूर्वक सलामी देईल व मरेपर्यंत १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या उत्सवात सहभागी होईल असे सांगत सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणींची जाणिव होऊन जाग यावी तसेच ७५ वर्षांनंतर तरी शेती क्षेत्राला व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या धोरणात बदल करुन शेतकऱ्यांना आतातरी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती व अपेक्षा व्यक्त करण्यासाठी मी मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले असल्याचे सांगितले आहे.