अंबे वडगाव पंचक्रोशीतील अवैधधंदे बंद झाल्याने उपोषण मागे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक या गावात व पंचक्रोशीत सट्टा, पत्ता, दारु हे अवैधधंदे मोठ्या प्रमाणात सुरु होते. या अवैधधंद्यामुळे गावपरिसरात अशांतता पसरली होती.घराघरात भांडणतंटे होण्याचे प्रमाण वाढले होते. कारण है अवैधंद्याचे अड्डे भरवस्तीत व हमरस्त्यावर खुलेआम चालत होते. यामुळे बरीचशी कुटुंब बर्बाद होण्याच्या मार्गावर होती. हे अवैधधंदे बंद करण्यासाठी चरणसिंग महारु राठोड. व महिलांनी आंदोलनाचा पावित्रा घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक जळगाव व वरिष्ठ पातळीवर निवेदन देऊन दिनांक २७ नोव्हेंबर शुक्रवारी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यासह वरिल गावांमध्ये सुरु असलेल्या अवैधधंदे करणारांकडे धाडसत्र राबवून अवैधधंदे करणारांना सळो की पळो करुन सोडले व त्यांना पळता भुई थोडी अशी परिस्थिती निर्माण झाली.तसेच यापुढे ही गावपरिसरात कुठेही अवैधधंदे आढळुन आल्यास आम्हाला त्वरित संपर्क करा व माहिती द्या आम्ही त्याचक्षणी कारवाई करु असे आश्वासन दिले.
तसेच धाडसत्रामुळे अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक या गावातील सर्व अवैधधंदे बंद झाल्याने व यापुढेही अवैधधंदे करणारांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने गावपरिसरातील महिला व सुज्ञ नागरिकांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सौ.निताजी कायटे व पोलिसांचे मनोमन आभार मानले व दिनांक २७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी उपोषणाला बसणार नसल्याचे जाहीर करत उपोषण मागे घेतले व तसे लेखी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिले आहे.
या पुढेही असेच अवैधधंदे बंद राहिल्यास आम्ही उपविभागीय अधिकारी मा.श्री. इश्वरजी कातकडे साहेब, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सौ.निताजी कायटे मँडम व त्यांच्या सहकाऱ्यांचा अंबे वडगाव येथे महिला मंडळ व ग्रामस्थ जाहीर सत्कार करणार आहेत. अशी माहिती उपोषणकर्ते चरणसिंग महारु राठोड. ग्रामस्थ व यांनी सत्यजीत न्यूजला दिली आहे.