कळमसरा गावाजवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, अपघातील जखमींना घेऊन मालक फरार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२१
पाचोरा व जामनेर तालुक्यात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज हिरव्यागार झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करुन राजरोसपणे ट्रॅक्टर मधून वाहतूक केली जात आहे.
मागील दोन दिवसापूर्वी कळमसरा ते शेंदुर्णी रस्त्यावर कळमसरा गावाजवळून लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर शेंदूर्णीकडे येत असतांनाच आपसातील चढाओढीत कळमसरा गावाजवळ एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात बसलेले दोन मजूर लाकडाखाली दबून जबर जखमी झाल्याची घटना घडली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतु संबंधित लाकुड व्यापारी व ट्रॅक्टर मालक एकच असल्याने या झालेल्या अपघाताची कुठेही खबर न देता या अपघातातील ट्रॅक्टर व जबर जखमी झालेल्या मजुरांना घेऊन ट्रॅक्टर मालकाने काही लाकडे घटनास्थळी सोडून पोबारा केला आहे.
दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करुन अवैधवाहतुक करतांना भररस्त्यात अपघात होतो त्यात हातावर पोट भरणारे दोन मजूर गंभीर जखमी होतात या घटनेची कुठेही खबर न देता त्यांना व अपघातग्रस्त वाहनास पळवून नेले जाते हा सगळा प्रकार पाहील्यावर कायदा जिवंत आहे किंवा नाही व कायद्याचा धाक संपला असून निसर्गसंप्तीची लुट करणारांची हिंम्मत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून यते.
तरी या अपघाताची चौकशी होऊन अपघातग्रस्त ट्रॅक्टर व त्यातील लाकूड तसेच जखमींची चौकशी होऊन संबंधितावर रीतसर कारवाई करण्यात यावी या विरप्पनच्या पिल्लावळीचा बंदोबस्त करून निसर्गसंप्ती वाचवण्यासाठी कडक कारवाई व्हावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.