लाखो की आमदानी हजारो मे तोडी पानी होत असल्याने अवैध धंदे व भ्रष्टाचारात वाढ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०७/२०२३
(लाखो की आमदानी, हजारो मे तोडी पानी होत असल्याने अवैध धंदे व भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.)
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या कृषी विभाग व आपत्ती व्यवस्थापनच्या आढावा बैठकीत पालकमंत्री मा. श्री .गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे आमदार मा. श्री. मंगेशजी चव्हाण, आमदार मा. श्री. चंद्रकांत पाटील यांनी अवैध दारूविक्रीबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव विभागासह, नाशिक येथील भरारी पथकाने जिल्ह्यात रविवारपासून थेट धाडसत्र राबवित अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी धडाका लावला आहे.
मात्र अद्यापावेतो उत्पादन शुल्क विभागाला म्हटल्याप्रमाणे यश आलेले नाही. तसे पाहिले तर यामागील कारण म्हणजे उत्पादन शुल्क विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे बोलले जात असले तरी “इच्छा असली तर मार्ग सापडतो” असे म्हणतात या म्हणीचा विचार केल्यास मागील काही वर्षापासून उत्पादन शुल्क अधिकारी व अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये जवळचे लागेबांधे होते की काय म्हणून हा जळगाव जिल्हाभरात अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांची बांडगुळासारखी संख्या वाढली आहे.
यामुळे जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात खेड्यापाड्यातील गावागावात, वाडा, वस्तीत, गल्लीबोळात, हॉटेल, किराणा दुकान, पान टपरी, धार्मिक स्थळांजवळ, शाळा, कॉलेजच्या जवळ, रस्त्यावर, महिलांच्या शौचालयाजवळ, भरवस्तीत मोक्याच्या ठिकाणी रात्रंदिवस मुबलक प्रमाणात गावठी व देशी दारुची विक्री केली जात आहे. यामुळे सगळीकडे अल्पवयीन मुले, तरुण वर्ग व म्हातारे अर्क मोठ्या प्रमाणात दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
या अवैध दारु विक्रीचे प्रमाण सांगायचे झाल्यास भर उन्हाळ्यात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होता मात्र अशा गावातून गावठी व देशी दारु मुबलक प्रमाणात मिळत असल्याने व्यसनाधीनता वाढत जाऊन अल्पवयीन मुले, तरुणवर्ग व म्हातारे अर्क हे भररस्त्यावर दारु पिऊन मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालत आहेत. तसेच घराघरात या दारुड्यांचा उपद्रव वाढला असल्यामुळे घराघरात भांडणतंटे, वादविवाद होत असून बऱ्याचशा घरांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे तर काही कुटुंब बर्बादीच्या उंबरठ्यावर उभी असल्याने महिलांचे घटस्फोट, आत्महत्या, महिलावर्गावर होणारे अत्याचार, मारठोक हे प्रकार वाढले आहेत.
आजही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, सातगाव डोंगरी, अंबे वडगाव, वरखेडी, शिंदाड, कोल्हे, कळमसरा, लोहारा, लोहारी व इतर लहानमोठ्या लोकसंख्येच्या गावात आजही गावठी दारुची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सुरु आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी नकली देशी दारुची खुलेआम विक्री केली जात असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावातही सट्टा, पत्ता, जुगार यासह गावठी दारुची खुलेआम विक्री सुरु असून जुगाराचे अड्डे सुरु आहेत. या जुगाराच्या अड्ड्यावर काही लोक लोखो रुपये घेऊन बसलेले असतात व जे जुगारी या पत्त्यांचा अड्ड्यावर पैसे हारतात त्यांच्या दुचाकी व इतर किंमती वस्तू गहाण ठेवून त्यांना हजारो रुपये व्याजाने देतात. विशेष म्हणजे या पैशांना दर बारा तासाला शंभराला दहा टक्के व्याज आकारणी केली जाते यामुळे आजपर्यंत बरीचशी कुटुंब बर्बाद झाली असून काही बर्बादीच्या उंबरठ्यावर आहेत. यामुळे आजपर्यंत बऱ्याचशा आत्महत्या झाल्या असून ही प्रकरणे परस्पर दडपण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
म्हणून पाचोरा तालुक्यातील गावागावातून विशेष करुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेले सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची अवैध विक्री व अवैध सावकारी थांबवण्यासाठी जिल्हा पातळीवरून प्रयत्न करून कायमस्वरुपी बंद करण्यात यावेत अशी मागणी गावागावातील महिला वर्ग व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.