पाचोरा शहरासह तालुक्यात ऑनलाईन चक्रीवादळाचा तडाखा, अनेक कुटुंब उद्ध्वस्त तर काही घरातील आर्थिक परिस्थिती बिकट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२४
सद्यस्थितीत सगळीकडे ऑनलाईन प्रणालीचा झपाट्याने वापर केला जात असून आजच्या धकाधकीच्या जीवनात ही ऑनलाईन प्रणाली अतिशय चांगली असल्याने महत्वाची कामे एका क्षणात होत आहेत. असे असले तरी या ऑनलाइन प्रणालीचा अतिरेक वाढला असून याचा गैरवापर होत असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील गाव, खेड्यात काही विकृत लोकांनी ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करुन ऑनलाईन चक्रीवादळ निर्माण केले आहे.
यामुळे या चक्रीवादळाच्या तडाख्यात अल्पवयीन तसेच तरुण मुले, जेष्ठ नागरिक व म्हातारे अर्क ओढले गेले असल्याने यांना दररोज हजारो रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी बरेचसे अल्पवयीन मुले, तरुण मुले व जेष्ठ नागरिक घरातुन खिशात पैसा घेऊन, काही लोक दिवसभर काम करुन कष्टाचा पैसा घेऊन तर काही लोक सावकारी, लहान, गहाण राहुन किंवा घरातील मौल्यवान वस्तू विकून ऑनलाईन चक्रीवादळाच्या मुख्य केंद्रावर जाऊन लालसेपोटी अगोदर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी अजून हातातील पैसा याठिकाणी खर्ची घालून अजूनच डबघाईस जात आहे. यामुळे घराघरात आर्थिक अडचण निर्माण झाली असल्याकारणाने दररोज भांडणतंटे, मारामाऱ्या, महिलांचा छळ होत असल्याने काही घरातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हे ऑनलाईन चक्रीवादळ असेच सुरु राहीले तर भविष्यात नक्कीच या चक्रीवादळाचा तडाखा बसून अनेक लहान मुले, तरुण तुर्क व म्हाताऱ्या अर्कांचे आयुष बरबाद होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील अशी भिती व्यक्त करण्यात येत असून मा. प्रांताधिकारी साहेब, मा तहसीलदार साहेब यांनी पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन चौकाचौकात, भररस्त्यावर, गल्लीबोळात, लहानमोठ्या टपऱ्या व काही घरात या ऑनलाइन चक्रीवादळाचे केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी धाडसत्र राबवून भविष्यात ऑनलाईन चक्रीवादळ निर्माण होणार नाही अशी व्यवस्था करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिलावर्गाकडून केली जात आहे.