पाचोरा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार, सडके गहू, तांदूळ व उंदराच्या लेंड्याचा भार. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२२
टिप~ (जून महिन्यातील धान्याचे वाटप ऑगस्ट महिन्यात करण्यात येत आहे हे विशेष मग एक ते दीड महिना घोड कुठे पेंड खात होत हा प्रश्न महत्त्वाचा आहे.)
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना पुरवण्यात येणारे धान्य अतिशय खराब तसेच गहू, तांदळात उंदराच्या लेंड्या तसेच बुरशी व अळ्या आढळून येत असून या धान्याला पाणी लागल्याने सडक्या धान्याचा पुरवठा केला जात असल्याने सर्वसामान्य जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील पुरवठा विभागापासून तर गावागावांतील स्वस्त धान्य दुकानातून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जातात परंतु या धान्याच्या काळाबाजाराच्या वाहत्या गंगेत पुरवठा विभागाचे (बोटावर मोजण्याइतके इमानदार) अधिकारी सोडले तर सगळेच अधिकारी व कर्मचारी तसेच गावागावातील स्वस्त धान्य दुकानदार सामिल असल्याकारणाने संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी व दुकानदारांवर पाहिजे तशी ठोस कारवाई होत नसल्याने ट्रक चे ट्रक भरुन धान्य काळ्या बाजारात पाठवले जाते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या जिल्ह्यात रेशनिंगचे धान्य चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात जात असतांना पोलीस प्रशासनाने बऱ्याचशा ठिकाणी वाहने पकडून कारवाई केली आहे.
तरीही हा रेशनिंग विभागातील काळा बाजार थांबता, थांबत नसून यात अजून भर पडली असून सडक्या, कुजक्या, उंदराच्या लेंड्या, वजन वाढावे यासाठी वाळू (रेती), बारीक खडे, अळ्या व बुरशीजन्य गहू, तांदूळाचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे शासनाकडून धान्य पुरवठा करतांना पन्नास किलो वजणाची एक गोणी येते परंतु ही गोणी प्रत्यक्ष मोजून पाहिल्यावर पुरेसे वजन नसते यात प्रत्येक गोणी मागे तीन ते पाच किलो वजनाची घट म्हणजे वजन कमी येते. धान्याचे वाटप करतांना सर्व्हर डाऊन आहे. वेबसाईट बंद आहे. पॉश मशिन खराब आहे. अशी कारणे सांगून ग्राहकाला कोणतीही पावती दिली जात नाही. तसेच या महिन्याला वरुनच धान्य कमी आले आहे अशी सबब सांगून प्रत्येक रेशनकार्ड धारकांना दोन ते तीन किलो धान्य कमी दिले जात असल्याच्या तक्रारी गावागावातून समोर येत आहेत.
(आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गुरे ढोरे खाणार नाहीत असे सडके गहू तांदूळाचे दुकानातून वितरण)
असाच काहीसा सावळा गोंधळ पाचोरा तालुक्यातील लोहारी गावात आढळून आला असून येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या गहू, तांदूळाच्या गोणी मध्ये उंदराच्या लेंड्या, बुरशी, दगड, माती व बुरशीजन्य गोळे आढळून आल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोहारी ग्रामस्थांनी धान्य घेण्यासाठी नकार देत दरमहा निकृष्ट धान्याची वाटप होते याबाबत वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही काहीएक फायदा होत नसल्याने लोहारी गावातील सुज्ञ नागरिकांनी सत्यजित न्यूजला सदरचा गैरप्रकार थांबण्यासाठी बोलावून घेत वस्तुस्थिती दाखवली. तसेच हे सडके धान्य खाल्यानंतर आम्हाला आमच्या आरोग्यासाठी घातकच असल्याने चांगले धान्य न मिळाल्यास आम्ही ठिय्या आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून सत्यजितच्या प्रतिनिधींनी लोहारी येथे जाऊन स्वस्त धान्य दुकानाचे सेक्रेटरी व प्रतिष्ठित नागरिक प्रविण पाटील यांच्या समोर गहू, तादूळाच्या गोण्यांची पहाणी करून छायाचित्रण केले. ही सत्य परिस्थिती पहाता आतातरी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या गैरप्रकारांची दखल घेऊन सखोल चौकशी करून या प्रकरणी जे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी व सर्वसामान्य, गोरगरिबांच्या आरोग्याशी व जीवाशी चाललेला खेळ थांबवून लाभार्थ्यांना पूरेपूर धान्य कसे मिळेल याकरिता योग्य त्या सुधारणा कराव्यात अशी मागणी केली जात आहे.