दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या पगाराची रक्कम जिल्हापरिषद जळगाव यांच्याकडून दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार पासून पाचोरा पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र पाचोरा येथील गटविकास अधिकारी मा. श्री. अतुल पाटील यांच्याकडे जळगाव येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला असल्याने हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयाकडे पाठ फिरवली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून सात दिवस उलटले तरीही जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांना पगार वाटप करण्यात आला नसल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर अदा करण्यासाठी जिल्हापरिषदेने स्वतंत्रपणे (झेड.पी.पी.एम.एस.) ही प्रणाली लागु केली आहे. मात्र पाचोरा गटविकास अधिकारी यांनी जळगाव येथील प्रभारी जागेचा पदभार स्वीकारल्यानंतर सात दिवस उलटले तरीही पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने शिक्षकांना वेळेवर पगार न मिळाल्याने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या संसारपयोगी वस्तू, दवाखाना, मुलांच्या शैक्षणिक फी किंवा शालेय साहित्य खरेदी तसेच गरजेपोटी घेतलेले गृहकर्ज व इतर वैयक्तीक कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर भरले जात नसल्याने शिक्षकवर्ग तणावाखाली आला असून त्यांचे सिव्हिल खराब होत आहे.

म्हणून गटविकास अधिकारी यांनी दोन दिवसाआड का होईना पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयात येऊन तातडीची कामे करावीत व जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांचे पगार येत्या दोन दिवसांत त्वरित अदा करावेत अन्यथा पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेकडून पगार मिळवून घेण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सत्यजित न्यूजच्या माध्यमातून दिला आहे.