पुरवठा विभागाचा प्रतिसाद न मिळाल्याने, तांदुळ घेऊन जाणारा संशयास्पद ट्रक अखेर पोलीसांच्या ताब्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०३/२०२४
सद्यस्थितीत शासन धर्मराजाची भुमिका निभावत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून रेशनकार्डावर कधी मोफत तरी कधी माफक दरात गहू, तांदूळ देत आहे. मात्र हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य वाटप करतांना अधिकारी वर्गाच्या संगनमताने कमालीची खेळी खेळून यातील बरेचसे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच बरेचसे रेशनकार्ड धारक हे त्यांना मिळणारे धान्य हे अत्यंत कमी भावात विक्री करत असल्यामुळे बरेचसे व्यावसायीक गाव, वाडा, वस्ती व खेड्यापाड्यात फिरुन या मोफत व अल्प किंमतीत मिळत असलेल्या तांदळाची दहा रुपये किलो भावाने खुलेआम खरेदी करतांना दिसून येते आहेत.
हा खरेदी केलेला तांदूळ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील राईस मिल मध्ये चोरट्या मार्गाने पाठवून रेशनिंगचे शासकीय बारदाण बदलून पध्दतशीरपणे पॉलिश करुन त्या रेशनिंगच्या तांदळाचे बासमती किंवा बाजारात मिळणाऱ्या इतर वाणाच्या तांदळासारखा तांदूळ बनवून तांदळावर करण्यात आलेल्या प्रकियेनुसार त्याला सुगंधित बनवून ३५ ते ६० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री करणारी एक टोळी पाचोरा तालुक्यात सक्रिय असल्याचे जनमानसातील खमंग चर्चेतून ऐकावयास मीळत असल्याने हा एक कुतूहलाचा विषय आहे.
याच चर्चेतून काल दिनांक १६ मार्च २०२४ शनिवार रोजी सायंकाळी एक तांदळाने भरलेला ट्रक जामनेर कडून वरखेडी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तांदळाने भरलेला ट्रक वरखेडी येथील मुख्य बाजारपेठेत थांबवून विचारपूस केली असता ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे सांगितले तेव्हा जनतेत सुरु असलेल्या चर्चेतील गांभीर्य लक्षात घेऊन ट्रकमध्ये असलेला तांदूळ हा रेशनिंगचा आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी पाचोरा पुरवठा विभातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संबंधित पुरवठा विभागाकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने सरतेशेवटी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवर माहिती देत योग्य ते सहकार्य करण्याची विनंती केली होती.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला असलेले पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेचच पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजित पाटील व संदीप राजपूत यांना वरखेडी येथे घटनास्थळी पाठवून खरा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी सांगितले संबंधित पोलीसांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेबाबत योग्य माहिती जाणून घेत मा. तहसीलदार साहेब पाचोरा यांना भ्रमणध्वनीवर सत्य परिस्थितीची माहिती दिली असता संशयास्पद आढळून आलेला ट्रक हा ताब्यात घेऊन योग्य ठिकाणी उभा करावा सकाळी पुरवठा अधिकारी येऊन ट्रकमध्ये असलेल्या तांदळाची तपासणी करुन निर्णय देतील असे सांगितले. त्यानुसार संबंधित तांदळाने भरलेला ट्रक वरखेडी येथील राईस मिलमध्ये सी. सी. टी. व्ही. च्या निगराणीत उभा करण्यात आला आहे.
आज सकाळी पाचोरा पुरवठा विभागाचे अधिकारी येऊन तांदळाची खात्री करुन योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. कारण या राईस मिलमध्ये दररोज रात्रभर खाजगी मालवाहू गाडीतून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणला जात असल्याने या ठिकाणी आणण्यात येणारा तांदळाची रात्रीच्या वेळीच का वाहतूक केली जाते असा संशय जनतेतून व्यक्त केला जात असून महाराष्ट्रात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात तांदूळाचे उत्पन्न घेतले जात नाही मग हा तांदूळ येतो तरी कुठून असा प्रश्न उपस्थित करत याठिकाणी येणारा बराचसा तांदूळ रेशनिंगचा असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तरी संबंधित राईस मिलची झाडाझडती घेऊन उच्चस्तरीय चौकशी करुन या गैरप्रकारांना आळा घालून गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याचा घोटाळा करणारांना पकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
मागील बातम्या
पाचोरा तालुक्यात चालतोय भ्रष्टाचाराचा असाही जादू मंतर, रेशनिंगच्या तांदळाचे होते बासमतीत रुपांतर. https://satyajeetnews.com/10543/
श्री. महासर माता राइस मिलमध्ये आर्थिक घोटाळ्यावरून हाणामारी झाल्याचे खात्रीलायक वृत्त. भाग, १ https://satyajeetnews.com/18820/