वनविभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा सुचल शहानपण, तक्रारीनंतर उगारला कारवाईचा बडगा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०३/२०२४
सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन भोजे येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या वक्रतुंड व इतर सॉ मिल वर कारवाईची मागणी केली होती व आजही कारवाई करण्यात यावी अशी मागणी कायम आहे.
असे असल्यावरही एका बाजूला तक्रारीत नमूद केलेल्या वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तर दुसरीकडे सॉ मालकाने विरप्पनलाही मागे टाकून कायदा धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात लाकुड खरेदी व लाकुड कटाई करुन जनतेच्या व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत सॉ मिलच्या परिसरातील तसेच नवीन लाकुड खरेदी करुन ते लाकूड भोजे शिवारातील कानाकोपऱ्यात टाकून लाकडाचा साठा केला होता.
ही याबाबत चिंचपूरा येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांना दिनांक १३ मार्च २०२४ बुधवार रोजी भोजे शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात लाकुड साठा पडलेला आहे अशी माहिती छायाचित्रासह मिळाली होती. अवैध लाकुड साठ्यावर कारवाई करण्यासाठी रितसर वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कळवणे क्रमप्राप्त होते मात्र मागील दोन वर्षांपासून वनविभागाकडे वारंवार तक्रारी करुनही काहीएक फायदा होत नसल्याने निलेश उभाळे यांना ही माहिती मिळताच त्यांनी ११२ नंबरवर फोन करुन या अवैध लाकुड साठ्यावर संबंधित विभागाकडून रितसर कारवाई करण्यासाठी मागणी केली होती.
या तक्रारीची दखल घेत संबंधित पोलीसांनी पाचोरा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली व कारवाई करण्यासाठी सुचित केले होते. मात्र अर्थपूर्ण कुंभकर्ण झोपेचे सोंग करणारे पाचोरा वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलानी यांच्या आदेशानुसार वनपाल प्रकाश सुर्यवंशी, वनरक्षक हिरालाल पाटील, प्रकाश सुर्यवंशी व प्रकाश देवरे यांनी आज दिनांक १५ मार्च २०२४ शुक्रवार रोजी भोजे शिवारातील अवैध लाकुड साठ्यावर कारवाई करत सर्व लाकडाचे मोजमाप केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या कारवाईमुळे निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कारवाई शेंदुर्णी, पाचोरा, लोहारा, भडगाव येथील लाकुड वखारीवर करण्यात यावी व पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी जामनेर परिसरातील खाजगी जमीनीवर पडलेल्या लाकुड साठ्याची चौकशी करुन कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.