भंगार व्यवसायाच्या माध्यमातून चोरीच्या वस्तू खरेदी होत असल्याचा संशय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी व पाचोरा शहरातील काही भंगार व्यावसायीकांच्या भंगाराच्या दुकानात तसेच भंगाराच्या गोदामात शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपासाठी वापरण्यात येणारी तांब्याचे तार असलेली केबल वायर तसेच ठिबक सिंचनासाठी वाटण्यात येणाऱ्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहे.
केबल वायर जाळून तांब्याची तार काढण्यासाठी लावलेली भट्टी
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील भोकरी व पाचोरा शहरातील काही भंगार व्यावसायीक भंगाराच्या वस्तू खरेदीच्या नावाखाली आपापली भंगाराची दुकाने थाटून बसले आहेत. या भंगाराच्या दुकानात फक्त आणि फक्त जुने लोखंड, ॲल्युमिनियम व प्लॅस्टिकच्या वस्तू घेणे बंधनकारक असतांनाच ते या भंगाराच्या व्यवसायाच्या अडून विद्युत पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल वायर घेऊन त्या आगीत जाळून त्या केबल वायरमध्ये असलेल्या तांब्याच्या तारा काढून चांगल्या भावत विक्री करत आहेत. तसेच पिकांना पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिबकच्या नळ्या, विद्युत पंप (मोटारी) कोणतीही शहानिशा न करता किंवा कोणत्याही बाबींची विचारपूस न करता खरेदी करत आहेत.
केबल वायर जाळून निघालेल्या तांब्याच्या तारा
या कारणांमुळे शेती शिवारातील विद्युत पंपाच्या केबल वायर व शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी अंथरुण ठेवलेल्या ठिबकच्या नळ्या यांची मोठ्याप्रमाणात चोरी केली जात असून हे चोरलेले शेती उपयोगी साधने मातीमोल भावाने भंगाराच्या दुकानात जाऊन विकत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले असून याबाबत सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही वरखेडी येथील एका भंगाराच्या व्यवसायाच्या दुकानात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत केबल वायर आढळून आली तसेच ही केबल वायर जाळून त्यातील तांब्याचे तार काढतांना संबंधित भंगार व्यावसायिकाला रंगेहाथ पकडण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात ठिबक नळ्या व काही फोडतोड केलेले विद्युत पंप आढळून आले. सोबतच ट्रॅक्टर चे स्पेअर पार्ट, दुचाकींची चाके व चेचीस अश्या संशयास्पद वस्तू आढळून आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या.
याबाबत संबंधित मालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत दुकानात छायाचित्रण, चित्रफीत बनवण्यासाठी मज्जाव करत केलेल्या पापावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हमरीतुमरीवर येऊन दबाव आणण्यासाठी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरुन भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रयत्न केला आहे. म्हणून वरखेडी, भोकरी व पाचोरा शहरातील व तालुक्यातील भंगाराच्या व्यवसायीकांची माहिती घेऊन त्यांच्या भंगाराच्या गोदामांची व दुकानांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
पुढील भागात स्वयंचलित दुचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा व इतर वाहनांची खरेदी करुन तोडफोड करत भंगाराच्या भावात विक्री यामुळे वाहने चोरीच्या घटनांमध्ये वाढ.