महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय
मुंबई,
महाराष्ट्रातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. हे भयंकर वास्तव लक्षात घेऊन राज्यात सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत.
या आदेशानुसार, सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पानटपरी, चहा-कॉफी नाश्ता केंद्र किंवा अन्य कुठल्याही दुकानात बिडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. येथे सिगारेट आणि बिडीचे संपूर्ण पाकीट विकणे बंधनकारक राहणार आहे.
राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने व्यसनांकडे वळत असल्याचे विविध स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. यातील गांभीर्य लक्षात घेत सरकारने तातडीने उपरोक्त आदेश जारी केला आहे.
सुट्या स्वरूपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत, तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनांच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.