दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२३

सद्यस्थितीत सगळीकडे दुचाकी, चारचाकी वाहानांसह मोबाईल शेतातील विद्युत मोटारी, ठिंबक सिंचन पाईप नळ्या, टिव्ही, टेपरेकॉर्डर, अश्या किंमती वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वरील किंमती वस्तू चोरीला गेल्यानंतर ज्यांच्याकडे चोरी झाली आहे ती व्यक्ती संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात पोलीस अधिकारी व कर्मचारी या बाबत इमानेइतबारे तपास करत असतात मात्र तरीही चोरी गेलेल्या वस्तू व मुद्देमाल मिळून येत नाही असा अनुभव येत आहे.

याबाबत बोलायचे झाल्यास पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात भंगाराचा व्यवसाय करणारांची संख्या वाढत चालली असून या भंगाराच्या व्यवसायीकांची व्याप्ती इतकी वाढली आहे की कोणत्याही परवानग्या न घेताच पाचोरा शहरासह वरखेडी, भोकरी, पिंपळगाव हरेश्वर व इतर गावांमध्ये भंगारचा व्यवसाय राजरोसपणे सुरु असून यासर्व व्यवसाय करणारांनी मोठमोठे गोदाम उघडले असून या गोदामासमोर एक ते दोन एकरावर आपला भंगारचा पसारा (डोलारा) परसवून ठेवला आहे. यामुळे या परिसरात मोठमोठे कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत.

यामुळे या भंगाराच्या गोदामासह आसपास पडलेल्या भंगाराच्या वस्तू उघड्यावर पडलेल्या असल्याने या परिसरात दुर्गंधी सुटते तसेच भंगारातील लोखंडी पत्रा, तारांचे तुकडे, हे रस्त्यावर पडून राहत असल्याने पायी चालणारांना व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून यामुळे रस्त्यावरुन जातायेतांना पायाला जखम होणे, वाहानांचे टायर पंक्चर होणे, पाळीव जनावरांच्या खाण्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येऊन त्यांना (फॉरेन बॉडी) म्हणजे मोठ्या आतड्यात अडथळा निर्माण होऊन पोट फुगून (फॉरेन बॉडी) होऊन गुराढोरांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत.

महत्वाचे म्हणजे वरील ठिकाणी भंगाराच्या दुकानांवर विक्रीसाठी आणलेल्या वस्तू म्हणजे दुचाकी, चारचाकी वाहानांसह मोबाईल शेतातील विद्युत मोटारी, ठिंबक सिंचन पाईप नळ्या, टिव्ही, टेपरेकॉर्डर, अश्या वस्तूंची खरेदी करतांना संबंधित भगार दुकानाचे मालक कोणत्याही प्रकारची विकत घेतल्याची पावती, पुरावा किंवा भंगार बाजारात विक्रीसाठी वस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तीची चौकशी न करता संबंधितांकडून वस्तू विकत घेतल्याया जातात व लगेचच (स्क्रॅप) तोडफोड करुन नष्ट केल्या जात असल्याने तसेच या बाबत कोणताही लेखी व्यवहार न करताच कमी किंमतीत या वस्तू खरेदी करुन घेत असल्याकारणाने चोरीच्या वस्तू विक्रीसाठी आणल्या जातात की काय असा संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे वरखेडी व भोकरी परिसरात एका व्यवसायीकाने जुने मोबाईल घेण्यासाठीचा व्यवसाय सुरु केला असून याठिकाणी दररोज बाहेरगावाहून दुचाकी व चारचाकी गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात मोबाईल, सी. पी. ओ. लॅपटॉप विक्रीसाठी आणले जातात व याठिकाणी कोणताही कागदोपत्री पुरावा न बघताच म्हणजे विक्रीसाठी आणलेल्या वस्तू कुठून विकत घेतल्या होत्या व तेव्हाची खरेदी पावती, पक्के (बिल) किंवा कोणताही पुरावा न घेताच मोठ्या प्रमाणात या वस्तूंची खरेदीविक्री केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या व्यवसायात कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात काही मोबाईल दुकानदारांनी उडी घेतली असल्याचे दिसून येते.

तसेच मागील महिन्यात भोकरी परिसरातील एका दुकानावर पोलीस येऊन गेले होते यामुळे चर्चेत असलेले संबंधित दुकान काही दिवस बंद होते मात्र आता नुकतेच त्याच ठिकाणी पुन्हा जुने मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा सपाटा सुरु झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत जनमानसातून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र विनापरवाना बेकायदेशीर भंगाराची दुकाने व स्कॅपचा यवसाय सुरुच राहीला तर मात्र दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढतच राहील अशी भिती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली असून या सर्व दुकानांची बारकाईने झाडाझडती करण्यात यावी म्हणजे भविष्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी होईल असे मत व्यक्त केले आहे.