वडगाव आंबे ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४ व १० सदस्य पदासाठी ५८ अर्ज दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४ अर्ज व १० सदस्य पदांसाठी ५८ असे एकूण ६२ अर्ज दाखल झाले आहेत. असे असले तरी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता छाननी व एकमेकांच्या मतपरिवर्तनातून सरतेशेवटी किती उमेदवार रिंगणात उतरतील हे ठरणार असले तरी या निवडणुकीत समोरासमोर दोन पॅनल मध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीमध्ये वडगाव जोगे व कोकडी तांडा या तांडा वस्तीच्या गावांचा समावेश असल्याकारणाने बंजारा समाजबांधवांनी एकत्रित येऊन एकमताने मतदान केले तर नक्कीच त्यांना पाहिजे त्या व्यक्तीला ते सरपंच बनवू शकतात. परंतु आपसातील मतभेद व वडगाव जोगे व कोकडी तांडा या गावात बाहेरील हस्तक्षेपामुळे आजपर्यंत असे घडले नसल्याने दोघेही तांडा वस्तीच्या गावांचा पाहिजे तेवढा विकास झालेला नसल्याचे आजपर्यंत दिसून येत आहे.
तसेच आजपर्यंत वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीची निवडणुक ही गाव पातळीवर होत होती. परंतु आता सगळीकडे या निवडणुकीत आजी, माजी आमदार, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हे सहभागी झाले असल्याने बऱ्याच ठिकाणी गावपातळीवर समेट होऊन बिनविरोध होणाऱ्या या निवडणुका आता अटीतटीच्या होऊ लागल्या असल्याचे दिसून येते.
असाच काहीसा प्रकार वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिसून येत असून या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार मा. दिलीप भाऊ वाघ, भाजपचे मा. अमोल भाऊ शिंदे यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उमेदवारी करण्यासाठी पाठबळ दिले आहे. मात्र उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी ह्या या निवडणुकीत अलिप्त असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार मा. किशोर आप्पा पाटील व माजी आमदार मा. दिलीप भाऊ वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन निवडणूक लढविण्यासाठी आपले पॅनल उभे केले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे मा. अमोल भाऊ शिंदे यांच्या समर्थकांनी स्वतंत्र पॅनल तयार करुन निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तरीसुद्धा माघारीनंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत वेट अँड वॉच.