नाचण खेडा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नाचणखेडा येथील कोमल नारायण महाजन माळी वय ४२ वर्षे यांनी कर्जाला कंटाळून ११ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतात कोणीही नसतांना कोणते तरी विषारी पदार्थ सेवन केले. सदरचा प्रकार गावातील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कोमल महाजन यांना पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
कोमल महाजन यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मा.श्री. अमित साळुंखे यांनी केले. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. या घटनेबद्दल गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.