“हम बने, तुम बने एक दुजे के लिए” पाचोरा शहरात प्रेमीयुगलांची गळफास लावून घेत आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे मुला, मुलींचे पळून जाणे, अल्पवयातच एकमेकांशी प्रेमात अडकून एखाद्या चित्रपटात शोभेल अश्या घटना घडत आहेत. हा प्रकार एवढ्यावरच थांबलेला नसून आईवडिलांची कोणतीही परवानगी न घेता सरळसरळ रजिस्टर लग्न करुन घेणे असे प्रकार घडत आहेत. या प्रकारांना घरातून, समाजातून विरोध केला म्हणजे निराशेच्या गर्तेत अडकून मागचा, पुढचा कोणताही विचार न करता आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत असून या घटनांमुळे मुला, मुलींचे पालक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार आज दिनांक २६ जून २०२३ सोमवार रोजी पाचोरा शहरात उघडकीस आला असून यात दोन प्रेमीयुगलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील मोंढाळा रस्त्यावर जितेंद्र राजु राठोड (वय १९ वर्षे) व साक्षी सोमनाथ भोई (वय १८ वर्षे) हे एकाच वस्तीतील रहिवासी असल्याने दैनंदिन कामकाजा निमित्त एकमेकांना भेटत असत. याच भेटीगाठीच्या रूपांतर वयानुसार प्रेमात कधी झाले हेच कळले नाही. याच ऐन उभरत्या वयात एकमेकांशी जवळचे संबंध आल्याने आना, भाका सुरू झाल्या व यातुनच आपण लग्न करुन आयुष्यभर एकत्र राहू अशी वचने देऊन हे दोघेही भविष्यातील स्वप्न रंगवत होते.
याची चाहूल दोघांच्या घरच्यांना किंचितही नसल्याने व साक्षी ही १८ वर्षाची झाल्यामुळे तीचे लग्न करुन आपली जबाबदारी पार पाडावी म्हणून मागील २३ जून २०२३ शुक्रवार रोजी साक्षीचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे समाजातील मुलाशी लाऊन देण्यात आले होते. साक्षीचे लग्न झाल्यावर तिच्या घरच्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला व आपण मोठ्या जबाबदारीतून मुक्त झालो म्हणून ते आनंदीत होते.
परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते साक्षीचे २३ जून रोजी लग्न झाल्यावर ती सासरी गेली होती. सासरी एक दिवस राहून दुसऱ्यादिवशी हळद फेडून हिंदू संस्कृतीप्रमाणे ती परत माहेरी आली होती. तीने घरी आल्यावर कोणाकडेही काहीही न बोलता मुकाट्याने राहत होती. परंतु तिच्या व जितेंद्रच्या मनात वेगळेच खलबते सुरु होते. यातुनच दिनांक २५ जून च्या रात्रीपासून तर २६ जून च्या सकाळपर्यंत सगळे झोपलेले असतांनाच साक्षी व जितेंद्र यांनी या दोघांचे कायमचे भेटण्यासाठीचे ठिकाणी मोंढाळा रस्त्यालगत असलेल्या पडक्या शाळेत आना, भाका खाऊन आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन दिले होते त्याच पडक्या शाळेत कमेकांना भेटत आता आपली ताटातूट होईल या भितीने मागचा, पुढचा कोणताही विचार न करता दोघांनीही गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली.
ही घटना दिनांक २६ जून २०२३ सोमवार रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना माहीत पडताच मोंढाळा रस्त्यालगत असलेल्या वस्तीमध्ये एकच खळबळ उडाली व सगळीकडे शोकमग्न वातावरण निर्माण झाले होते. या घटनेबाबत पाचोरा पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन जय मल्हार रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन पुढील कार्यवाही केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाचोरा शहर व तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुचना~
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबाच्या रोजीरोटीसाठी धडपडत असतांना आपल्या घरातील मुलामुलींकडे जातीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.