गोवंश गाय, बैलांचे आठवडी बाजार पूर्ववत सुरु करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

दिलीप जैन.(पाटील)
दिनांक~०७/१०/२०२३

जळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गोवंशाच्या जातीच्या जनावरांमध्ये लंम्पी या त्वचारोगाची लागण झाली होती. या आजाराची बऱ्याचशा गायी, बैलांना लागण होऊन गाय, बैल दगावली होती. याची दखल घेऊन संबंधित विभागाने युध्दपातळीवर लसीकरण मोहीम राबवून लंम्पी प्रतिबंधक उपाययोजना केल्या होत्या व आजही सुरु आहेत. परंतु हा आजार संसर्गजन्य असल्याकारणाने गाय व बैलांचा एकत्रित बाजर भरवल्यास या आजाराची व्याप्ती वाढू शकते हा धोका लक्षात घेऊन आपल्या जळगाव जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी गुरांच्या बाजारात गोवंशीय गाय व बैल यांच्या खरेदी, विक्रीवर बंदी घातली आहे.

परंतु आता या लंम्पी आजाराची तीव्रता कमी झाली असल्याचे सांगितले जात असुन या महिन्यात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात बैलजोड्या खरेदी करतात, तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचा शेतातील कामे आटोपली असल्याने बरेचसे शेतकरी आपल्या मालकीचे बैल विक्रीसाठी बाजारात आणतात परंतु बैल बाजार बंद ठेवण्यात आले असल्याने खरेदी, विक्री थांबली आहे. यामुळे ऊसतोड कामगार, पशुधन पालक व व्यापारी हे अडचणीत सापडले असल्याने यांनी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील, उपसभापती मा. श्री. प्रकाश दादा पाटील यांची भेट घेऊन गाय व बैलांचा बाजार पूर्ववत सुरु करण्याची गळ घातली आहे.

याची दखल घेत आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. गणेश पाटील व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. रावसाहेब पाटील यांनी नुकतीच जिल्हाधिकारी मा. श्री. आयुष्य प्रसाद साहेब यांची भेट घेऊन सर्व बाबी समजून सांगत गोवंशाच्या जातीच्या गाय व बैलांचा बाजार पूर्ववत सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची दखल घेत योग्य ती माहिती घेऊन सोमवारी लवकरात, लवकर बैल बाजारावर घातलेली बंदी उठवण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

*पशुधन पालक व व्यापाऱ्यांना जाहीर सुचना*
—————————————————————-
सदरील बातमी ही मिळालेल्या माहितीनुसार प्रसिध्दीस दिली आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी गाय बैलांचा बाजार पूर्ववत सुरु करण्याची मागणी मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याने आदेश येईपर्यंत पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात भरणाऱ्या गाय व बैलांच्या बाजारात आपली जनावरे विक्रीसाठी आणू नये व बातमीचा गैरफायदा घेऊन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भुमिका घेऊ नये ही सत्यजित न्यूज पाचोरा यांचेकडून जाहीर विनंती आहे.
—————————————————————–

ब्रेकिंग बातम्या