शेंदुर्णी परिसरात दिवसाढवळ्या हिरव्यागार निंबाच्या झाडांची कत्तल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२२
जामनेर तालुक्यातील शेती शिवारात तसेच गावपरिसरात लाकुड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून शासनाची कोणतीही रितसर परवानगी न घेताच दररोज हिरव्यागार शेकडो वृक्षांची कत्तल करत आहेत. या कत्तलीकडे वनविभाग, महसूल विभाग, मा.तहसीलदार, मा. प्रांताधिकारी हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निसर्गप्रेमींकडून केला जात आहे.
(एका ध्येयवेड्या निसर्गप्रेमींने लाकुड व्यापाऱ्याच्या दहशतीला घाबरून फोटो लांबून काढले असल्याने स्पष्ट दिसत नसले तरी, समजदाराला इशारा पुरे असतो.)
शासन वर्षानुवर्षांपासून झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा, या मोठमोठ्या जाहिराती करून दरवर्षी लाखो रुपये खर्च करुन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला ४० ते ५० वर्षाची जुनी झाडे दिवसाढवळ्या कत्तल केली जात असल्याने निसर्गप्रेमींनी याबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध संतापजनक प्रतिक्रिया देत सुरु असलेली बेसुमार वृक्षतोड त्वरित थांबवा संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशीच वृक्षतोड आज रोजी शेंदुर्णी येथील पारस मंगल कार्यालयाच्या पाठिमागे असलेल्या शेतात सुरु असून याठिकाणी मागील ४०/५० वर्षापासून डौलाने उभ्या असलेल्या डौलदार निंबांच्या झाडाची कत्तल दिवसाढवळ्या केली जात आहे. ही वृक्षतोड पाहून काही निसर्गप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. परंतु वन विभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी तसेच इतर संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी लाकुड व्यापाऱ्याचे असलेल्या अर्थपूर्ण संबंध हे मजबूत असल्याकारणाने कोणाकडेही ओरड केल्यास फक्त फोनवर होकार भरला जातो. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली जात नसल्याने, तसेच तक्रारदाराचे नाव जाहीर करुन त्रास दिला जात असल्याकारणाने काही वृक्ष प्रेमींनी सत्यजित न्यूज कडे वृक्षतोड होत असलेल्या जागेचे छायाचित्र काढून याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी बातमी लावण्याची विनंती केली असून आतातरी कारवाई होऊन सगळीकडे सुरु असलेली बेसुमार वृक्षतोड थांबवण्यासाठी वनविभाग व संबंधित अधिकारी हे पुढे येतील का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्त्वाचे~
एका बाजूला शासन निसर्गसंपत्ती वाचवण्यासाठी कोटीने पाण्यासारखा पैसा खर्च करत असतांना दुसरीकडे मात्र दुसरीकडे जी निसर्ग संपत्ती आता अस्तित्वात आहे ती नष्ट करण्याचा घाट काही लोकांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी होत असेलेली बेसुमार वृक्षतोड यामुळे निसर्गात होणारे विपरीत परिणाम उन्हाळ्यात पावसाळा तर पावसाळ्यात उन्हाळा, कधी पाऊस जास्त तर कधी कमी, उन्हाळ्यामध्ये वाढते तापमान या वातावरणाच्या बदलामुळे उद्भवणारे विविध आजार, याचे जिवंत उदाहरण म्हणून कोरणा सारखे महामारी सारखे संकट या संकटात ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे तरी सुध्दा आपण थोड्याशा पैशासाठी चोवीस तास कोणताही मोबदला न घेता ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल करत आहोत.
ही कत्तल अशीच सुरू राहिल्यास भविष्यात ओझोन वायूचा स्थर कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल व मानव जीवनच नव्हे तर भुतलावरील सर्व सजीव सृष्टीला जगणे मुश्कील होईल अशी भीती सुज्ञ जाणकारांनी व्यक्त केले आहे. कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने गरजेपोटी किंवा अमाप पैसा कमावण्यासाठी विविध पळवाटा काढून दररोज हजारो एकर शेतजमीनीचे बिगरशेतीत रुपांतर त्याजागी कारखाने, मोठमोठ्या इमारती, लॉन्स, मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहेत. तसेच रस्त्याच्या रुंदिकरणासाठी व गरज नसतांना बुलेट ट्रेनचे भुत जागे करुन त्याकरिता मार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपिक जमीन हिसकावून घेतल्या जात आहेत. हे करत असतांना हिरवीगार जंगल नष्ट होत आहेत तर दुसरीकडे दररोज हजारोंच्या संखेने स्वयंचलित वाहनांची भर पडत असून हि कोट्यवधी वाहने दररोज वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडत आहे. हे चक्र सतत असेच सुरु राहिल्यास नक्कीच हे मानव व सर्व सजीवांसाठी धोकादायक आहे हे मात्र निश्चित.