दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२३

पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत कोल्हे ग्रामस्थांच्या चर्चेनुसार मिळालेल्या माहितीवरुन सत्यजित न्यूज कडून संबंधित तरुणाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. श्री. शेखर पाटील यांनी आज दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२३ शनिवार रोजी तीन पथकाव्दारे कोल्हे गावात जाऊन जलद ताप सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणात कोल्हे गावातील एकुण २४९ घरांचा सर्व्हे करण्यात आला यात ७९१ कंटेनर तपासले असता एकही कंटेनर दूषित आढळून आला नाही तसेच तापाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. विशेष काळजी घेण्याच्या हेतूने मयत भुषण तडवी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे रक्त नमुने घेऊन त्यांचेवर हिवतापाचे उपचार करण्यात आले असल्याचे सांगितले तसेच मयत भुषण तडवी याचे उपचारादरम्यानचे तपासणी अहवाल तपासून पाहिले असता तपासणी अहवालात मलेरिया अहवाल निगेटिव्ह आढळून आला असून डेंग्यू तपासणी केल्याचा कोणताही अहवाल आढळून आला नसल्याची माहिती वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील यांनी सत्यजित न्यूजला दिली आहे.

तसेच कोल्हे गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता कोल्हे ग्रामस्थांना योग्य त्या सुचना देत कोल्हे गावातील सांडपाण्याच्या गटारीची साफसफाई करुन त्या वाहत्या करणे, पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे टाक्यांवर झाकण ठेवणे, घराघरांतून सायंकाळी धुर करण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबवून धुर फवारणी करावी, आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा, शक्य झाल्यास मच्छरदाणीचा वापर करा अश्या सुचना देत येणारा आठवडाभर गावात जलद ताप सर्व्हेक्षण करण्यात येणार असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे अश्या सुचना दिल्या. या जलद ताप सर्व्हेक्षण पथकात वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शेखर पाटील, आरोग्य सहाय्यक अनिल पाटील, योगेश पाटील, गजानन ढाकरे, दिनेश चौधरी, गोकुळ शिरसाठ आरोग्य सेवक व सेविका यांनी अथक परिश्रम घेतले.