डेंग्यू आजाराने हिरावला घरचा कुलदीपक, कोल्हे येथील तडवी कुटुंबावर काळाचा घाला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथून जवळच असलेल्या कोल्हे गावात एका २४ वर्षीय तरुणाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ०६ ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार रोजी घडली आहे. या घटनेमुळे कोल्हे येथील तडवी कुटुंबासह कोल्हे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हे येथील भुषण शाम्मद तडवी हा २४ वर्षीय तरुण मागील दोन दिवसांपासून ताप आल्याने आजारी होता. घरची परिस्थिती नाजूक असल्याने त्याने उपचारासाठी दुर्लक्ष केले मात्र काल जास्तच त्रास जाणवू लागल्याने तो पिंपळगाव हरेश्वर येथील एका खाजगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता परंतु संबंधित डॉक्टरांनी भुषण याला प्रथमोपचार करुन चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता.
या सल्ल्यानुसार भुषण तडवी हा आज सकाळी पाचोरा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता. भुषण याची तपासणी केल्यानंतर त्याला डेंग्यू आजाराची लक्षणे जाणवत असल्याने डॉक्टरांनी भुषण याच्या काही तपासण्या कराव्या लागतील असे सांगून त्याला उपचारासाठी दवाखान्यात भरती करुन घेतले होते. परंतु उपचारादरम्यान भुषण तडवी याची प्रकृती साथ देत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी त्याला एखाद्यावेळी जळगाव येथे हलवावे लागेल अशी सुचना दिली होती.
यामुळे गावातील काही समाजबांधवांनी जळगाव जाण्यासाठी तयारी दर्शवली होती. मात्र नियतीला ते मान्य नसावे म्हणून की काय आज सायंकाळी उपचारादरम्यान भुषण तडवी याने या जगाचा निरोप घेतला. आज रात्री पाऊणे अकरा वाजता भुषण तडवी याचेवर कोल्हे येथे शोकमय वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भुषण हा शाम्मद तडवी यांचा एकुलता, एक मुलगा होता. ऐन उमेदीच्या वयात वयाच्या २४ व्या वर्षी डेंग्यू आजाराने त्याचा मृत्यू झाला असल्याने शाम्मद तडवी यांच्या कुटुंबावर दुख्खाचा डोंगर कोसळल्याने कोल्हे गावासह पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
(अशोक सुरडकर कोल्हे सरपंच)
गावाच्या जवळच धरण असून गावाच्या मध्यातून नदी वाहत असल्याने गावाच्या अवतीभवती दलदल निर्माण झाली आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत होता याची दखल घेऊन आम्ही गावात दोन वेळा धुराळ फवारणी केली आहे. तसेच आजही पुन्हा फवारणी करणार होतो परंतु आज ही वाईट घटना घडल्यानंतर आता उद्या फवारणी करणार असल्याचे सांगितले.
पावसाळा संपला असला तरी सद्यस्थितीत गाव परिसरात सांडपाण्याचे डबके, सांडपाण्याच्या गटारी, गावाच्या भोवताली पावसाच्या पाण्याचे साचलेले डबके व काही गावांच्या जवळपास असलेल्या नद्या व नाले या ठिकाणी पाणी साचले असल्याने सगळीकडे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत चालली असून यात डेंग्यूचे डास आढळून येत आहेत. या डासांच्या निर्मूलनासाठी काही ठिकाणी उपाययोजना केल्या जात असल्या तरी बऱ्याचशा ठिकाणी या विषयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून संपूर्ण पाचोरा तालुक्यातील गावागावातून स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन फवारणी करावी अशी मागणी गावागावातून केली जात आहे.